Sunday, May 5 2024 3:42 pm

मुंबई उपनगर जिल्हा माध्यम कक्षास माध्यम प्रतिनिधींनी दिली भेट

मुंबई उपनगर, 25 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निमित्त मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, वांद्रे (पूर्व), मुंबई येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या माध्यम कक्ष आणि माध्यम प्रमाणन व सनियंत्रण कक्षास विविध माध्यमांच्या प्रतिनिधींनी भेट देवून पाहणी केली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निवडणूक उपजिल्हाधिकारी तेजस समेळ यांच्या सहकार्याने माध्यम कक्ष तथा माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती गठित करण्यात आली आहे. या समितीत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील वरीष्ठ सहाय्यक संचालक तथा ‘दिलखुलास’ ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमाचे समन्वय अधिकारी केशव करंदीकर हे मुख्य समन्वयक आहेत.

यावेळी माध्यम प्रतिनिधींनी भेट देवून माध्यम कक्षाच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली. मुख्य समन्वयक श्री. करंदीकर यांनी माध्यम कक्षाचे कामकाज, माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीचे कामकाज याविषयीची सविस्तर माहिती माध्यम प्रतिनिधींना दिली. यावेळी टीव्ही मॉनिटरिंग, सोशल मीडिया मॉनिटरिंग आदींची माहिती त्यांनी जाणून घेतली. माध्यम कक्षाचे चाललेले कामकाज, प्रशासन आणि प्रसारमाध्यमे यामध्ये दुवा म्हणून माध्यम कक्षाकडून मिळणारी माहिती सर्व प्रसारमाध्यम प्रतिनिधींना उपयुक्त ठरत असल्याची प्रतिक्रिया माध्यम प्रतिनिधींनी दिली.