Sunday, June 21 2026 12:32 am
latest

‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा, दहा कामांची मर्यादा हटणार

नवी दिल्ली, 14 – ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘मातोश्री ग्रामसमृद्धी’ पाणंद रस्ता कामांवर असलेली ‘दहा कामांची मर्यादा’ आता लवकरच हटवण्यात येणार आहे. केंद्र सरकारने या प्रस्तावाला तत्त्वतः मंजुरी दिली असून, यामुळे कामांना गती मिळणार असल्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले.

राज्यात मागील काही महिन्यांपासून एका गावात दहापेक्षा अधिक कामे सुरू करण्यास मर्यादा असल्याने अनेक ठिकाणी पाणंद रस्त्यांची कामे प्रलंबित होती. या पार्श्वभूमीवर  रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. केंद्रीय मंत्री चौहान यांनी पाणंद रस्त्यांच्या कामांना तातडीने गती देण्यास होकार दर्शवला असून राज्यात लागू असलेली मर्यादा लवकरच पूर्णपणे उठवली जाईल, असे आश्वासन यावेळी  दिले.

या निर्णयामुळे राज्यभर पाणंद रस्त्यांची कामे सुरळीतपणे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला यामुळे चालना मिळणार आहे. शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठेत जलद आणि  सुरक्षितरित्या पोहोचवता येईल, वाहतूक खर्च कमी होईल तसेच गावांच्या दळणवळण व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होईल. मातोश्री ग्रामसमृद्धी उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यास हा निर्णय महत्त्वाचा ठरेल असा विश्वास रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला.

000