Friday, October 16 2026 3:39 am

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार; धाराशिवमध्ये दिवाळी किटचे वाटप

एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार प्रताप सरनाईक यांचा पुढाकार; फराळ, कंदील, पणत्या यांचा किटमध्ये समावेश

ठाणे, ता. १५ : राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची दिवाळी गोड करण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांसाठी दिवाळी किट तयार केले आहे. या माध्यमातून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या बळीराजाच्या घरात दिवाळीचा आनंद पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

पावसाअभावी धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत सणाच्या आनंदापासून शेतकरी कुटुंबे वंचित राहू नयेत, या उद्देशाने दिवाळी किटचे वाटप करण्यात येणार आहे. या किटमध्ये दिवाळीच्या फराळाचे साहित्य, कंदील, पणत्या, कालनिर्णय यांसह विविध वस्तूंचा समावेश आहे.

शिवसेनेचे शाखाप्रमुख, नगरसेवक आणि जिल्हाप्रमुख यांच्या माध्यमातून ही मदत शेतकरी कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. तसेच मतदारसंघातील गोरगरीब नागरिकांनाही या किटचे वाटप केले जाणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

‘दुष्काळामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. अशा कठीण परिस्थितीत बळीराजाच्या घरातही दिवाळीचा आनंद पोहोचला पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर हसू फुलले पाहिजे, हीच आपली भावना आहे,’ असे प्रताप सरनाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

यावेळी युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, नगरसेवक राकेश शिंदे, नगरसेविका शीतल ढमाले यांच्यासह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.