Wednesday, May 13 2026 4:38 pm

सिंधुताई सपकाळ तिरंदाजी केंद्रात ‘पॅडेल कोर्ट’चे भूमिपूजन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न

युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या संकल्पनेतून साकारत आहेत हा उपक्रम

ठाणे, १३ : ओवळा-माजीवडा विधानसभा मतदारसंघातील पोखरण रोड नं. २ येथील सिंधुताई सपकाळ तिरंदाजी केंद्रामध्ये खेळाडूंसाठी अत्याधुनिक “पॅडेल कोर्ट” उभारणीच्या कामाचे भूमिपूजन आज परिवहन मंत्री तथा स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले.

या पॅडेल कोर्ट प्रकल्पाची संकल्पना युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांची असून, युवकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.

या प्रसंगी ठाणे शहराच्या महापौर शर्मिला पिंपोळकर, स्थानिक नगरसेविका परिषा सरनाईक, जयश्री डेव्हिड, सुलेखा चव्हाण, नगरसेवक सिताराम राणे, तसेच उपायुक्त मिनल पालांडे यांच्यासह नागरिक, क्रीडाप्रेमी, युवा खेळाडू आणि ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

आधुनिक क्रीडा संस्कृतीला चालना देणे आणि युवकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, “पॅडेल हा जगभरात झपाट्याने लोकप्रिय होत असलेला खेळ असून तो टेनिस आणि स्क्वॉशचा संगम मानला जातो. हा खेळ सर्व वयोगटांसाठी उपयुक्त आणि मनोरंजक आहे. ठाण्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळाव्यात, तसेच भविष्यात राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार व्हावेत, यासाठी हे पॅडेल कोर्ट महत्त्वाची भूमिका बजावेल.”

सिंधुताई सपकाळ तिरंदाजी केंद्रामध्ये उभारण्यात येणारे हे कोर्ट आधुनिक तांत्रिक सुविधांनी सुसज्ज असणार असून युवकांना नियमित सरावासाठी उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या उपक्रमामुळे परिसरातील क्रीडा संस्कृतीला नवी दिशा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या कामाची अंमलबजावणी करण्यात येणार असून, लवकरात लवकर काम पूर्ण करून खेळाडूंसाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.