ठाणे (20) : ठाणे महानगरपालिका उद्यान विभाग व पर्यावरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझी वसुंधरा’ आणि ‘LiFE – Lifestyle for Environment’ जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5 जून ते 7 जून 2026 या कालावधीत जैवविविधता उद्यान, वनपार्कच्या मागे हिरानंदानी इस्टेट, ठाणे येथे विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
याच अनुषंगाने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी शाडू मातीची गणेशमूर्ती बनविण्याची विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा 5 ते 7 जून 2026 दरम्यान दररोज सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात येणार असून ती सर्वांसाठी खुली राहणार आहे.
या कार्यशाळेमध्ये तज्ज्ञ मूर्तिकारांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना शाडू मातीपासून गणेशमूर्ती साकारण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. पर्यावरणपूरक उत्सव साजरा करणे, निसर्गाची जपणूक, शाश्वत पर्यायांचा वापर तसेच कला आणि संस्कृतीचे जतन या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाने नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले असून, आपल्या सोयीच्या कोणत्याही दिवशी नोंदणी करून कार्यशाळेत सहभागी होता येणार आहे. विनामूल्य असलेल्या या उपक्रमाचा लाभ नागरिकांनी घ्यावा व नोंदणीसाठी क्यूआर कोड स्कॅन करण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
