Friday, October 16 2026 4:30 am

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून ठाणे महापालिकेच्या विविध विकास उपक्रमांची पाहणी

खारेगांव येथील ठामपा – क्रिस्टल हाऊस इंडिया सीबीएससी शाळेला दिली भेट; विद्यार्थ्याशी संवाद साधताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे भारावले
माजिवडा येथील ‘डॉग शेल्टर’ची केली पाहणी

ठाणे 15 : ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून खारेगाव (सफायर रुग्णालयाजवळ) सुरू करण्यात आलेल्या ठाणे महानगरपालिका – क्रिस्टल हाऊस इंडिया यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या सीबीएसई शाळेला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी केवळ शाळा आणि तेथील विकासकामांची पाहणीच केली नाही, तर विद्यार्थ्यांशी अत्यंत आपुलकीने संवाद साधला.

यावेळी विरोधी पक्ष नेते शानू पठाण, आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त 1 प्रशांत रोडे, अतिरिक्त आयुक्त 2 नितीन राठोड, उपायुक्त डॉ. मिताली संचेती, माजी खासदार आनंद परांजपे, ज्येष्ठ नगरसेवक रमाकांत मढवी, स्थानिक नगरसेवक मिलिंद पाटील, नजीब मुल्ला, बाबाजी पाटील, अर्चना पाटील, गणेश कांबळे आदी उपस्थित होते.

देशभरातील ‘क्रिस्टल हाऊस’ची ही चौथी शाळा आहे. यापूर्वी त्यांनी बंगळुरू, रायपूर आणि पुणे येथे शाळा सुरू केल्या असून, आता ठाणेकरांसाठी ही खारेगावची शाळा एक वरदान ठरत आहे. आगामी काळात मुंब्रा दिवा परिसरातही अशाच प्रकारच्या शाळा सुरू करण्याचा मानस असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले. यासाठी महापालिकेने फक्त जागा उपलब्ध करुन दिली असल्याचेही त्यांनी सांगितले. या शाळेत विद्यार्थ्यांना पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंत मोफत शिक्षण दिले जाते. यामध्ये मोफत गणवेश, पुस्तके, शैक्षणिक साहित्य, विद्यार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था आणि शाळेपर्यंतची मोफत वाहतूक या सर्व सुविधांचा समावेश आहे. तसेच विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यावरही भर दिला जात आहे. या उत्कृष्ट उपक्रमाबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सर्व शिक्षक आणि व्यवस्थापनाचे मनापासून कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून भारावले खासदार

शाळेच्या वर्गखोल्यांची पाहणी करत असताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी योगवर्ग, संगीतवर्ग, संगणक कक्ष आणि वाचनालयात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या चिमुकल्या विद्यार्थ्यांशी बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद पाहून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे काही क्षण ते पूर्णपणे भारावून गेले. शिक्षकांशी चर्चा करून त्यांनी शाळेत राबवल्या जाणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली.

माजिवाड्यातील ‘डॉग शेल्टर’ला भेट

या दौऱ्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून माजिवडा उड्डाणपुलाखाली तयार करण्यात आलेल्या 150 डॉग शेल्टरला भेट दिली. शहरातील श्वान व्यवस्थापनासाठी आवश्यक निवारा सुविधा उपलब्ध करून देणे, गरजेनुसार श्वानांना सुरक्षितरीत्या ठेवणे आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असल्याच्या या उपक्रमाची माहिती जाणून घेतली. या शेल्टरमधील सोयी-सुविधांची त्यांनी सविस्तर पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून संपूर्ण आढावा घेत आवश्यक त्या सूचना केल्या. यावेळी मुख्यवैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, डॉ. राणी शिंदे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. क्षमा शिरोडकर, डॉ. संगीता धायगुडे आदी उपस्थित होते.