Friday, October 16 2026 3:40 am

ठाण्यात ४० अनधिकृत बांधकामे आणि १०० स्टॉल..

आमदार संजय केळकर यांनी आयुक्तांना दिला छायाचित्रांचा अल्बम..

ठाणे 15 – धोकादायक आणि अनधिकृत सँडविच सेंटरला भीषण आग लागल्यानंतर शहरातील पदपथ आणि रस्ते व्यापणारे स्टॉल, फेरीवाले आणि अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आज आमदार संजय केळकर यांनी आयुक्तांची भेट घेत १०० अनधिकृत स्टॉल, ४० अनधिकृत बांधकामांची छायाचित्रे नागरिकांच्या असंख्य तक्रार अर्जांसह सादर केली. यावेळी आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईचे कडक निर्देश दिले.

शहरात वाढते अनधिकृत फेरीवाले, पदपथ, रस्ते व्यापणारे अनधिकृत स्टॉल, अनधिकृत इमारतींची बांधकामे यामुळे शहर बकाल झाल्याचे दिसत असून आमदार संजय केळकर यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेत ४० अनधिकृत बांधकामे आणि १०० स्टॉलची छायाचित्रे सादर केली. सहायक आयुक्तांकडून ठराविक ठिकाणी कारवाई केली जाते. अर्थपूर्ण व्यवहार करणारी टोळी पालिका वर्तुळात वावरत असल्याचा आरोप श्री. केळकर यांनी केला. अनधिकृत बांधकामांनी राबोडीची दैना झाली असून येथील नागरिकांनी सहायक आयुक्त हटाव, राबोडी बचाव असा नारा देत मोर्चा काढला आहे. त्यामुळे उथळसर प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी श्री. केळकर यांनी केली. कोर्टाचे आदेश आल्याशिवाय आणि पोलिसांनी अटक केल्याशिवाय महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाईच करत नसल्याचा आरोप श्री.केळकर यांनी माध्यमांशी बोलताना केला ठाण्यात अनधिकृत फेरीवाले वाढतच असून फेरीवाला धोरणाऐवजी फेरीवाले वाढवण्याचे धोरण महापालिका प्रशासन राबवत असल्याचा गंभीर आरोप श्री. केळकर यांनी केला.

ठाणेकरांना अखंड वीज पुरवठा व्हावा म्हणून महावितरणने महापालिकेकडे ट्रान्सफॉर्मर उभारण्यासाठी भूखंडांची मागणी वारंवार करूनही भूखंड उपलब्ध होत नसल्याचे श्री.केळकर यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी आयुक्तांनी चार भूखंड उपलब्ध करून देण्याचे मान्य केल्याची माहिती श्री. केळकर यांनी दिली.

बैठकीत जोगीला तलाव सुशोभिकरणाचा विषयही चर्चेला घेण्यात आला. संरक्षक भिंतीचे काम न झाल्याने दोन बालिकांचा तलावात बुडून मृत्यू झाला. या घटनेस ठेकेदार आणि संबंधित अधिकारी जबाबदार असून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी श्री.केळकर यांनी केली. याबाबत प्रकल्प आणि संबंधित घटनेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आयुक्तांनी सांगितले.

बैठकीत दिवा, मुंब्रा पाणी पुरवठा योजना, इलेक्ट्रिक वेहीकल चार्जिंग स्टेशनसाठी जागा यावरही सकारात्मम चर्चा करण्यात आली.