शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून भरीव मदत होईल
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही
नवी दिल्ली, 08 – राज्यातील भीषण दुष्काळाबाबत शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये दुष्काळाबाबत तासभर चर्चा झाली. दुष्काळाचे संकट मोठं असून केंद्र सरकार दुष्काळ निवारणासाठी राज्याला भरीव मदत करेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीनंतर व्यक्त केला. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दुष्काळात शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, शेतकऱ्याची दिवाळी काळी होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आजच्या बैठकीत पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील दुष्काळावर आस्थेवाईकपणे माहिती घेतली. राज्यातील पाण्याची परिस्थिती, शेतीची स्थिती, जनावरांच्या चाऱ्याबाबत माहिती घेतली. राज्याचे मंत्रिमंडळ बांधावर गेले होते व शेतकऱ्यांना मानसिक आधार दिल्याची माहिती पंतप्रधानांना दिल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. दुष्काळाचे संकट मोठं असून शेतकऱ्यांसोबत ठामपणे उभे आहोत, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिल्याचे ते म्हणाले. केंद्राच्या शेतकरी सन्मान योजनेतून वार्षिक ६००० आणि राज्याच्या नमो शेतकरी योजनेतून ६००० असे १२ हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. गेल्या वर्षी अतिवृष्टीत शेतकऱ्यांना मदत केली होती. सरकारच्या तिजोरीवर बळीराजाचा पहिला अधिकार आहे, तो संकटात असताना सरकार हात आखडता घेणार नाही, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
विरोधी पक्षांना काही काम उरलेलं नाही ते फक्त मोर्चे काढणे, आंदोलन करणे, पंतप्रधानांवर व गृहमंत्र्यांवर आरोप करणे यातच ते धन्यता मानत आहेत, अशी बोचरी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली.
निवडणुकीत ज्यांना लोकांनी गाडले तेच गाडण्याची भाषा करतात
महाराष्ट्रातील जनतेने ज्या लोकांना निवडणुकीत गाडून टाकले तेच गाडण्याची भाषा करतात, अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशाला पुढे नेत आहेत. प्रधानमंत्र्यांबद्दल सन्मान असायलाच हवा, मात्र त्यांच्यावर आरोप केले की हेडलाईन होते, हे खालच्या पातळीवरचे राजकारण लोकांना पटत नाही. भारताचे वैमानिक स्मित माच्छार यांच्या शौर्याचे जगभरात कौतुक होते आहे, त्याने पंतप्रधान मोदींना प्रेरणास्थान मानले. संकटकाळात माच्छार यांनी हनुमान चालीसा म्हटली होती. तर हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना त्यांनी जेलमध्ये टाकले होते, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. ते हायकोर्टावर आरोप करतात, सुप्रीम कोर्टावर आरोप करतात. उद्या ते सरन्यायाधीशांची निवडणूक घ्या, असे बोलायला कमी करणार नाही. जे बोलतात ते लोकांमधून निवडून आलेले नाहीत. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरांवर दगड मारु नये, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला लगावला.
