Friday, October 9 2026 2:33 am

‘मोदींच्या २५ वर्षांच्या अविरत सेवेमुळे देश विकासाच्या शिखरावर’

ॲड. निरंजन डावखरे : ठाण्यात ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात

ठाणे, 08: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या अविरत शासनसेवा आणि राष्ट्रनिर्माणाच्या प्रवासानिमित्त ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात पार पडली. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी सामूहिक शपथ घेण्यात आली.
यावेळी दिल्ली येथे आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे थेट प्रक्षेपण मोठ्या पडद्यावर करण्यात आले. विकासाची दिशा, राष्ट्रनिर्माणाचा संकल्प, आत्मनिर्भर भारताची वाटचाल आणि २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचे लक्ष्य याबाबत पंतप्रधान मोदी यांनी मांडलेले विचार उपस्थितांनी ऐकले.
नरेंद्र मोदी यांनी २००१ मध्ये गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सार्वजनिक जीवनात शासनप्रमुख म्हणून २५ वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सुमारे १३ वर्षे आणि मे २०१४ पासून देशाचे पंतप्रधान म्हणून १२ वर्षांहून अधिक काळ त्यांनी नेतृत्व केले आहे. या कालखंडात विकास, पायाभूत सुविधा, डिजिटल परिवर्तन, जनकल्याण, महिला सक्षमीकरण, युवा, शेतकरी आणि आत्मनिर्भरतेवर भर देण्यात आल्याचे डावखरे यांनी सांगितले.
‘विकसित भारत’ हा केवळ सरकारचा संकल्प नाही
‘विकसित भारत’ हे केवळ सरकारचे ध्येय नसून १४० कोटी भारतीयांच्या सहभागातून साकार होणारा राष्ट्रीय संकल्प आहे. नागरिकांच्या गरजा आणि अपेक्षा केंद्रस्थानी ठेवून ‘नागरिक देवो भव’ या भावनेतून राष्ट्रनिर्माणाची वाटचाल सुरू आहे. ‘कर्म ही मेरा धर्म’ या विचारातून कर्तव्य, सेवा आणि समर्पणाची भावना प्रत्येक नागरिकाने अंगीकारणे आवश्यक असल्याचे डावखरे यांनी सांगितले.
यावेळी ‘हमारा संकल्प विकसित भारत’ या विकसित भारताच्या शपथेचे सामूहिक वाचन करण्यात आले. २०४७ पर्यंत भारताला आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविणे, गुलामीची मानसिकता व तिच्या खुणा दूर करणे, समृद्ध सांस्कृतिक वारशाचा अभिमान बाळगणे, देशाची एकता व एकात्मता अधिक मजबूत करणे आणि सुजाण नागरिक म्हणून कर्तव्यांचे प्रामाणिकपणे पालन करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.
‘हम कर के रहेंगे’चा निर्धार
विकसित भारताचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘We Will Do It’, ‘हम कर के रहेंगे’ हा प्रेरणादायी मंत्र दिला. या आवाहनाला प्रतिसाद देत उपस्थितांनी विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी सक्रिय सहभाग देण्याचा निर्धार केला.
महिला सक्षमीकरणातून ‘Women Led Development’, शेतकरी कल्याणाच्या योजना, ‘Khelo India’च्या माध्यमातून युवा खेळाडूंना मिळणाऱ्या संधी तसेच गरीब आणि वंचित घटकांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा यावेळी उल्लेख करण्यात आला. विकासाचा अर्थ केवळ आर्थिक प्रगती नसून नागरिकांमध्ये आत्मविश्वास, स्वाभिमान आणि नव्या संधी निर्माण करणे हाही आहे, असे डावखरे यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास उपमहापौर कृष्णा पाटील, ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, गटनेते नगरसेवक मुकेश मोकाशी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.