Friday, October 30 2026 11:53 am

अक्कलकुवा तालुक्यातील विकास कामांना गती द्यावी- पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

नंदुरबार, 30 : अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागात प्रतिकूल परिस्थितीत राहणाऱ्या आदिवासी बांधवांना रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी आहे. नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष मिळावा, यासाठी अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देऊन विकासकामांना गती द्यावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

अक्कलकुवा तालुकास्तरीय आढावा बैठक पालकमंत्री श्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली अक्कलकुवा तहसील कार्यालयात येथे संपन्न झाली. बैठकीस आमदार आमश्या पाडवी ,जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी लघीमा तिवारी, तहसीलदार विनायक घुमरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री मुश्रीफ म्हणाले की, दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या आणि अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे. स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत नियमितपणे सोबत दर एक-दोन महिन्यांनी नियमित आढावा बैठका घेऊन स्थानिक प्रश्न सोडविण्यावर भर द्यावा.

आदिवासी बांधवांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे हे आपले सामूहिक दायित्व आहे. दुष्काळ निवारणासाठी प्रभावी नियोजन करा दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करावी. आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा. आवश्यकतेनुसार विंधन विहिरींची कामे करावीत. जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याचेही नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिले.

जलसंधारण, जलपुनर्भरण आणि पाणीसाठा वाढविणाऱ्या कामांना प्राधान्य देऊन भविष्यात दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबवाव्यात.

दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना शासन त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास द्यावा. शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची अग्रिम मदत देण्याबाबतही कार्यवाही करावी, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी कोणत्याही संकटाला घाबरून जाऊ नये. शासनाकडून त्यांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

बैठकीत महसूल, आरोग्य, पशुधन, कृषी, विद्युत, सार्वजनिक बांधकाम, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), प्रधानमंत्री घरकुल योजना, ग्रामीण पाणीपुरवठा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जल जीवन मिशन आणि हर घर जल यांसह विविध योजना व विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित विभागांनी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, पात्र लाभार्थ्यांना वेळेत लाभ मिळवून द्यावा आणि विकासकामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी परस्पर समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी यावेळी दिले.

आमदार आमश्या पाडवी यांनी घरकुल धारकांना प्रधान मंत्री सूर्य घर योजनेचा लाभ द्यावा. प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रशासकीय मंजुरी मिळावी, तसेच तालुक्यात रोजगार हमीची कामे करण्याच्या सूचना दिल्या.