ठाणे,08: आदिवासी विकास विभागाच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत आदिवासी बांधवांसाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती, मार्गदर्शन व पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ वितरण करण्याचा विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास आदिवासी विकास विभाग, ठाणे चे अपर आयुक्त श्री. गोपीचंद कदम (भा.प्र.से.) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याप्रसंगी शहापूरचे तहसिलदार श्री. परमेश्वर कासुळे, प्रकल्प अधिकारी श्री.अरविंद जाधव, सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. दिवाकर काळपांडे, सहाय्यक लेखाधिकारी श्री. विजय कोरडे यांसह विभागातील अनेक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना मान्यवरांनी महिला सक्षमीकरण, शिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार आणि आर्थिक उन्नतीसाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजनांवर सविस्तर प्रकाश टाकला. योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणारी आवश्यक पात्रता, कागदपत्रांची पूर्तता व अर्ज प्रक्रियेबाबत उपस्थितांना सोप्या भाषेत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
शासनाच्या विविध कल्याणकारी योजना थेट तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास साधणे, हाच सेवा संकल्प अभियानाचा मुख्य हेतू असल्याचे या वेळी अधोरेखित करण्यात आले.
या कार्यक्रमास स्थानिक नागरिक, महिला, विद्यार्थी व लाभार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियोजनबद्ध आणि सक्रिय सहभागामुळे हा सोहळा अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.
