Friday, October 9 2026 4:34 am

स्पेनमध्ये झालेल्या ‘कॉनकुर इंटरनॅशनल्स २०२६’ स्पर्धेत महाराष्ट्राच्या गोविंदांनी घेतला सहभाग

उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या गोविंदांचा स्पेन दौरा यशस्वी
मुंबई 08 : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि सहकार्याने तसेच प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील गोविंदांचा संघ स्पेनमधील ‘कॉनकुर इंटरनॅशनल्स २०२६’ स्पर्धेत सहभागी झाला. ही स्पर्धा मानवी मनोरे बांधण्याच्या कलेतील प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धांपैकी एक आहे. या स्पर्धेत ९ पैकी ९ थरांचा मनोरा रचत कॅस्टेलर्स विला फ्रांका(CastellersdeVilafranca) या संघाने बाजी मारली.

प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक आणि महाराष्ट्रातील शिष्टमंडळाने स्पेनमधील ‘तारागोना’ येथे प्रसिद्ध ‘कॉनकुर फेस्टिवल’ला भेट दिली. स्पेनमध्ये साजरा होणारा हा उत्सव आपल्या महाराष्ट्रातील दहीहंडी उत्सवाशी सांस्कृतिकदृष्ट्या संबंधित आहे आणि यामध्ये मानवी मनोरे सादर करण्यात येतात. यंदाच्या वर्षी यामध्ये ४२ संघांनी सहभाग घेतला.

यावेळी, महाराष्ट्राच्या संघाला ‘कॅस्टेलर्स विला फ्रांका’ या जगातील सर्वात यशस्वी मानवी मनोरे बांधणाऱ्या संघासोबत सहयोग करण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमात दोन्ही संघांनी एकत्रित मनोरे बांधण्याचा सराव केला व एकमेकांच्या मानवी मनोरे उभारणाच्या कौशल्याचे आदान-प्रदान केले. आपल्या पारंपरिक दहीहंडी खेळाला जागतिक व्यासपीठावर नेता आले याचे अत्यंत समाधान आहे.

या संपूर्ण दौऱ्याचे आयोजन आणि व्यवस्थापन महाराष्ट्र राज्य दहीहंडी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र पांचाळ, बाळा पडेलकर आणि गीता झगडे यांच्या नेतृत्वाखाली उत्तमरीत्या पार पडले. त्यांच्या अथ्थक प्रयत्नांमुळे भारताचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सशक्त प्रतिनिधित्व करण्यास यश मिळाले.

पुर्वेश सरनाईक आणि महाराष्ट्रातील गोविंदांनी ‘कॅस्टेलर्स विला फ्रांका’ संघाचे आभार मानले. त्याच्यासोबत स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली. या सहयोगामुळे भारत आणि स्पेन यांच्यातील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ झाले असून, मानवी मनोरे बांधण्याच्या या कलेचे तांत्रिकदृष्ट्या आदान-प्रदान करण्यास मदत होते, असा विश्वास पुर्वेश सरनाईक यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या ऐतिहासिक दौऱ्यामुळे महाराष्ट्राचे गोविंदा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली कर्तबगारी सिद्ध करू शकले. यामुळे दोन्ही राष्ट्रांतील सांस्कृतिक बंध दृढ झाले आणि महाराष्ट्राच्या गोविंदांनी जागतिक स्तरावर एकता, सामर्थ्य, आणि जिद्दीचे प्रदर्शन केले.