Friday, October 9 2026 4:08 am

प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे येथे जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह उत्साहात संपन्न

“अनुभवलेल्या व्यथा ऐकूया” या संकल्पनेने जनजागृतीवर भर

ठाणे,08:- ‘अनुभवलेल्या व्यथा ऐकू या : खरे आवाज, खरा बदल’ या २०२६ च्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या मध्यवर्ती संकल्पनेला अनुसरून प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे येथे विविध जनजागृतीपर उपक्रमांचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
मानसिक आजारांचा प्रत्यक्ष सामना केलेल्या व्यक्तींचा संघर्ष, पुनर्वसन आणि त्यांचे अनुभव समाजाने संवेदनशीलतेने समजून घ्यावेत, तसेच त्यांच्या आवाजाला आरोग्य सेवांच्या केंद्रस्थानी स्थान मिळावे, या मुख्य उद्देशाने हा सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडला.
सप्ताहाच्या निमित्ताने रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात (OPD) एक विशेष पोस्टर प्रदर्शन भरवण्यात आले होते. यामध्ये मानसिक आजारांशी निगडित गैरसमज दूर करणे, वेळेवर उपचारांचे महत्त्व, पुनर्वसनाचा मार्ग आणि समाजात अशा व्यक्तींचा स्वीकार याविषयी मार्गदर्शन करणारी संदेशपर पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आली. रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि नागरिकांकडून या प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद मिळाला.
दुसरीकडे, व्यवसायोपचार विभागात (Occupational Therapy Department) योग्य उपचारांच्या बळावर मानसिक आजारातून पूर्णपणे सावरून आत्मविश्वासाने जीवन जगणाऱ्या रुग्णांच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित चित्रफिती दाखवण्यात आल्या. याप्रसंगी अशा यशोगाथा घडवणाऱ्या रुग्णांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा विशेष गौरव करण्यात आला.
“मानसिक आजारातून सावरणे पूर्णपणे शक्य असून पुन्हा आनंदी व नियमित आयुष्य जगता येते,” असा दृढ विश्वास या उपक्रमातून व्यक्त झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ठाणे उपसंचालक डॉ. कैलास पवार यांनी भूषवले. त्यांच्या शुभहस्ते जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या मुख्य थीमचे अनावरण करण्यात आले. ठाणे, पालघर आणि रायगड या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आरोग्य विभागामार्फत मानसिक आरोग्यासाठी सातत्याने जनजागृती शिबिरे, ओपीडी सेवा आणि रॅलीजचे आयोजन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे हे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे सेवा केंद्र असून भविष्यात या सेवा अधिक व्यापक, सुलभ आणि सक्षम करण्यासाठी शासन तत्पर असल्याचे त्यांनी नमूद केले.
रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांनी रुग्णालयाच्या दृष्टिकोनावर प्रकाश टाकला. रुग्णांकडे केवळ रुग्ण म्हणून न पाहता कुटुंबातील सदस्याप्रमाणे मायेने, सन्मानाने आणि संवेदनशीलतेने पाहण्याची भूमिका त्यांनी अधोरेखित केली. याच आपुलकीच्या वातावरणामुळे अनेक रुग्ण उपचार पूर्ण करून आत्मविश्वासाने मुख्य प्रवाहात परतत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचा शुभारंभ दंतशल्यचिकित्सक डॉ.अर्चना पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. मानसिक आरोग्य सेवेत सहानुभूती आणि संवेदनशीलता अत्यंत आवश्यक असून, आरोग्य विभागातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या या कौतुकास्पद भूमिकेचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
‘ऐकण्यापासून कृतीकडे’ हा मोलाचा संदेश देत, मानसिक आरोग्याविषयी समाजात संवेदनशीलता, स्वीकार आणि पुनर्वसनाची नवी आशा निर्माण करत हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.