Wednesday, July 8 2026 1:06 pm

निमगाव लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी एक महिन्यात वनविषयक प्रक्रिया पूर्ण करणार – वन मंत्री गणेश नाईक

मुंबई, 08: गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील निमगाव व इंदोरा परिसरातील निमगाव लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी आवश्यक वनविषयक प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात येणार असून, वनविभागाकडून सर्वतोपरी सहकार्य देऊन एक महिन्याच्या आत प्रकल्पासंदर्भातील कार्यवाही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती वन मंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत दिली.

सदस्य विजय रहांगडाले यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री संजय पुराम, राजकुमार बडोले आणि नाना पटोले यांनी सहभाग घेतला.

वन मंत्री नाईक म्हणाले की, निमगाव लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी पूर्वी उपलब्ध करून देण्यात आलेल्या काही जमिनी झुडपी जंगल स्वरूपाच्या असल्याने केंद्रीय वनविभागाने त्या प्रस्तावांना मान्यता दिली नव्हती. भविष्यात राज्य किंवा केंद्र शासनाच्या प्रकल्पांना अशा अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी महसूल विभाग आणि वनविभागाच्या संयुक्त प्रयत्नांतून लँड बँक तयार करण्यात आली आहे. या लँड बँकेच्या माध्यमातून आवश्यक पर्यायी जमीन उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून, संबंधित प्रकल्पासाठी वनविभागाकडून आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल. त्यामुळे प्रकल्पाच्या मंजुरी व अंमलबजावणीतील अडथळे दूर होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.