मुंबई, 08 : सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील उर्वरित गावांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने फेरसर्वेक्षण करण्यात येणार असून, यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन मार्ग काढला जाईल, अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत दिली.
सदस्य मनोज घोरपडे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य अतुल भोसले आणि अभिजित पाटील यांनी सहभाग घेतला.
जलसंपदा मंत्री विखे पाटील म्हणाले की, संबंधित भागासाठी गुरुवर्य लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन (जिहे कठापूर) योजनेसह दोन योजनांचा विचार करण्यात येत आहे. टेंभू उपसा सिंचन योजनेअंतर्गत पाणी वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, अतिरिक्त पाण्याची मागणी लक्षात घेऊन कृष्णा नदीतून अथवा अन्य पर्यायी उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी उपलब्ध करून देता येईल का, याबाबत फेरसर्वेक्षण सुरू आहे. जिहे कठापूर योजनेतून अतिरिक्त पाण्याची मागणी करण्यात आली आहे. शासन या मागणीबाबत सकारात्मक असून विस्तृत क्षेत्राला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले.
कोरेगाव तालुक्यातील काही गावांना सध्या पाणीपुरवठा होत असला तरी उर्वरित पाच ते सहा गावांचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येईल. यासाठी फेरसर्वेक्षण करून पाणीपुरवठ्याबाबत योग्य कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
