Friday, July 3 2026 6:11 pm
latest

वसई-विरारमधील पूरस्थिती नियंत्रणासाठी सर्वंकष आराखडा तयार करण्याचे निर्देश -राज्यमंत्री माधुरी मिसाळ

नालेसफाईची चौकशी होणार
मुंबई, 03: वसई-विरार शहरातील पूरस्थिती, नालेसफाई आणि नागरी पायाभूत सुविधांबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची गंभीर दखल घेण्यात आली असून नालेसफाईच्या कामांची चौकशी करून आठ दिवसांत अहवाल मागविण्यात येणार आहे. चौकशीत अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेतील लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

सदस्य स्नेहा दुबे यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.

राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले की, वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात सुमारे १९१ किलोमीटर लांबीचे नाले असून नालेसफाईच्या कामांची वस्तुनिष्ठ चौकशी करण्यात येणार आहे. महानगरपालिकेतील शहर अभियंता पदाचा कार्यभार सध्या प्रभारी अधिकाऱ्याकडे असल्याचे निदर्शनास आले आहे. या पदावर सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती पुढील १५ दिवसांत करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वसई-विरारचा भौगोलिक परिसर खोलगट स्वरूपाचा असल्याने दरवर्षी पूरस्थिती निर्माण होते. यावर दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रातील सात नागरी भागांमध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्रे (एसटीपी) उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यापैकी ३० एमएलडी क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात आला असून १०३ एमएलडी क्षमतेच्या प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे. तसेच आणखी दोन प्रकल्पांच्या निविदा प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

नगरोत्थान आणि अमृत योजनांमधून वसई-विरारसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असला, तरी शहरातील पूरस्थितीवर कायमस्वरूपी नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वंकष कृती आराखडा आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. महानगरपालिकेकडे उपलब्ध असलेल्या नाले, जलनिस्सारण व्यवस्था आणि भौगोलिक परिस्थितीविषयक माहितीच्या आधारे संपूर्ण पूरनियंत्रण आराखडा तयार करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वसई-विरारमध्ये दरवर्षी उद्भवणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी नियोजनबद्ध आणि दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याबाबत शासन कटिबद्ध असल्याचे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.