Monday, June 1 2026 11:40 pm

पाली बसस्थानकाच्या पुनर्बांधणी प्रकल्पाची पाहणी

आधुनिक व सर्व सुविधांनी युक्त बसस्थानक उभारण्याचा निर्धार

पाली 01 : राज्यातील एसटी प्रवाशांना अधिक दर्जेदार व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पाली बसस्थानकाच्या पुनर्बांधणी प्रकल्पाची आज राज्याचे परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांनी पाहणी केली. यावेळी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी ना. सरनाईक यांनी श्री बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले. तसेच उपस्थित सुधागड तालुका वाशी यांनी सरनाईकांचे उत्स्फूर्त स्वागत केले.

पाली येथील बसस्थानकासाठी सुमारे १५ हजार ७५७ चौ.मी. क्षेत्रफळाची जागा सन १९७१ मध्ये संपादित करण्यात आली होती. या जागेवर सन १९७८ मध्ये बसस्थानकाची इमारत उभारण्यात आली होती. कालबाह्य झालेली जुनी इमारत सन २०२२ मध्ये पाडण्यात आल्यानंतर प्रवाशांच्या सोयीसाठी अत्याधुनिक सुविधांनी सज्ज नवीन बसस्थानक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नवीन बसस्थानकात ८ फलाटांचे सुसज्ज बसस्थानक, प्रशस्त प्रतीक्षालय, स्वतंत्र कँटीन, विद्यार्थी पासधारक व आरक्षणधारकांसाठी विशेष सुविधा, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, चालक-वाहकांसाठी विश्रामगृह, चौकशी कार्यालय, प्रशासकीय कार्यालये, दुकाने, उपहारगृह तसेच इतर विविध प्रवासी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. लवकरच निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष बांधकाम कार्यास गती देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पाली हे महत्त्वाचे धार्मिक व पर्यटन केंद्र असून येथे दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक आणि प्रवासी येत असतात. त्यामुळे आधुनिक, स्वच्छ व सर्व सुविधांनी युक्त बसस्थानक उभारून प्रवाशांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी एसटी महामंडळ कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.