भविष्यात सुरक्षेच्या उपाययोजनांवर भर
ठाणे, 01 : गावदेवी भाजी मंडईतील ओटलेधारकांचे पुनर्वसन व मंडईचे नुतनीकरणाबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधी दक्ष आहेत. सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी नुकतीच एक बैठक शुक्रवारी दिनांक 29/5/2026 रोजी महापालिकेत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मंडईचा पुनर्विकास, ओटलेधारकांची यादी तयार करणे व आवश्यक त्या सोईसुविधा उपलब्ध करण्याबाबत सर्वंकष चर्चा करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंडईच्या कामाबाबत दैनंदिन आढावा घेत असून नुतनीकरण करत असताना मंडईतून बाहेर पडण्यासाठी जास्तीत जास्त मार्ग ठेवण्याच्या सूचना ही त्यांनी प्रशासनाला दिल्या असून त्याचीही अंमलबजावणी करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
महापालिकेच्या कै. अरविंद पेंडसे सभागृहात झालेल्या बैठकीस सभागृह नेते हणमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, स्थानिक नगरसेवक संजय वाघुले, सुनेश जोशी, मृणाल पेंडसे, नगरसेवक रमाकांत मढवी, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, सहाय्यक आयुक्त महेशकुमार जामनोर, राजेश सोनावणे, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवाणी, मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, सुनील पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत गावदेवी भाजीमंडईतील ओटलेधारकांच्या योग्य पुनर्वसनासाठी स्थावर मालमत्ता विभागामार्फत प्रस्ताव तयार करण्यात यावा. तसेच पार्किंग व्यवस्थेची योग्य ती काळजी घेण्यात यावी, मार्केट मधील हवा खेळती रहावी यासाठी मार्केटच्या चारही बाजू खुल्या राहतील यासाठी उपाययोजना कराव्यात. आवश्यकता भासल्यास बाहेरील ओटलेधारकांचे दुसरीकडे स्थलांतर करण्याबाबत व भविष्यात महानगरपालिकांच्या आस्थापनांमध्ये अशा प्रकारच्या आगीच्या घटना घडू नयेत याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
गावदेवी भाजी मंडईच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर जिल्हा नोंदणी कार्यालय होते. त्याऐवजी या पुढील काळात या मजल्यांचे रुपांतर हे पूर्णपणे प्रभाग समिती कार्यालयात रुपांतरीत करण्याबाबतचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच सध्या दुरावस्थेत असलेल्या भाजी मंडईची तातडीने दुरुस्ती करून भाजी विक्रेत्यांना लवकरात लवकर सुस्थितीतील ओटले हस्तांतरित करण्यात येतील. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत तातडीने आवश्यक कामे पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना या बैठकीत देण्यात आल्या आहेत.
संपूर्ण मार्केट परिसराचा एकात्मिक विकास करत नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी १२ मीटरचा डीपी रस्ताही विस्तारित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच नागरिकांशी संबंधित कार्यालये पहिल्या मजल्यावर स्थलांतरित करणे, तसेच संपूर्ण इमारतीच डिझाईन करताना हवा खेळती राहील अशी व्यवस्था करणे, तसेच अग्निसुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी आणि नियमित तपासणी करण्यासाठी विशेष नियोजन करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासन अधिक दक्षतेने कार्य करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. तळमजल्यावरील पुरूष तसेच महिला शौचालयाचे नुतनीकरण करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या. मार्केटच्या पुनर्वसनाबाबत महापालिका दक्ष असून लवकरच गाळेधारक व नागरिकांसाठी भाजी मंडई खुली होणार असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.
