Saturday, April 25 2026 5:29 pm

ठामपाच्या माध्यमातून बाळकूम परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहिम

ठाणे 25 : ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग क्र. 8 माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज (शुक्रवार दि. 24/4/26) सर्वंकष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत उपमहापौर कृष्णा पाटील, स्थानिक नगरसेवक संजय भोईर, उषा भोईर, सपना भोईर यांच्यासह परिसरातील नागरिक देखील या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वंकष स्वच्छता मोहिम ही संकल्पना सुरू केली. त्यानुसार ठाणे शहरात सर्वच ठिकाणी स्वच्छता मोहिम सुरू आहे. परंतु ही मोहिम अधिक व्यापक स्वरुपात राबवण्याचा निर्धार महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केला आहे. ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील 131 प्रभागांमध्ये ही मोहिम राबविण्यात येणार आहे. आज प्रभाग क्र. 8 मधील बाळकुम परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.

माझे ठाणे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन, यासाठी मी पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करीन, ओला कचरा. सुका कचरा हा वेगवेगळा करेन अशी स्वच्छतेची शपथ घेवून बाळकुम नाका येथून या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. बाळकूम नाका परिसरातील रस्ते झाडून स्वच्छ करण्यात आले, त्यानंतर पुनर्वापर केलेल्या पाण्याचा वापर करुन परिसरातील रस्ते पाणी मारुन धुण्यात आले.

बाळकूम नाका परिसर, साईबाबा मंदिर परिसर, त्याचप्रमाणे प्रभागातील अंतर्गत रस्त्यावर सफाई कर्मचाऱ्यांच्या पथकाने परिसराची स्वच्छता केली. या मोहिमेत स्थानिक नगरसेवकांसमवेत उपायुक्त मधुकर बोडके, दिनेश तायडे, सहायक आयुक्त सोनल काळे, स्व निरीक्षक मुकेश नेसवणकर, मयुरी वखारीया, उपमुख्य स्व निरीक्षक लक्ष्मण पुरी,हेमंत चौधरी यांच्यासह विविध विभागाचे कर्मचारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.