ठाणे, 25 : जिल्ह्यातील टँकरग्रस्त गावांमध्ये नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश सासे यांनी दिली.
सध्या शहापूर तालुक्यात २० गाव, ८६ पाडे असे एकूण १०६ गाव पाड्यांमध्ये २६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच मुरबाड तालुक्यात १ गाव व ३ पाड्यांसाठी १ टँकर कार्यरत आहे. या माध्यमातून टँकरग्रस्त भागांतील नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्भवणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक नियोजन केले असून, पाणीपुरवठ्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी संबंधित यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. टँकर पुरवठ्याचे नियोजन काटेकोरपणे राबविण्यात येत असून, आवश्यक त्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना करण्यात येत आहेत.
“ग्रामस्थांना मुबलक व स्वच्छ पाणी मिळावे यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. ज्या ठिकाणी पाणीटंचाई निर्माण होते, त्या ठिकाणी तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे,” असे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी सांगितले.
जिल्ह्यातील टँकरग्रस्त भागांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत राहावा यासाठी प्रशासनाकडून नियमित पाहणी व नियंत्रण ठेवण्यात येत असून नागरिकांच्या गरजेनुसार पुढील उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
