मुंबई, 13 : नवीन चंद्रपूर शहर विकास योजनेला गती देण्यासाठी आवश्यक निधी आणि नियोजन करण्यात येणार असून १५५ कोटी रुपयांच्या रस्ते विकास योजनेला लवकरात लवकर मंजुरी देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी विधानसभेत दिली.
सदस्य सुधीर मुनंगटीवार यांनी नवीन चंद्रपूर विकास योजनेबाबत उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री डॉ. भोयर बोलत होते.
राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले की, नवीन चंद्रपूर शहर विकास आराखड्यास नगरविकास विभागाने ३० जून १९९८ रोजी अधिसूचनेद्वारे मंजुरी दिली होती. या योजनेंतर्गत कोसारा, दातळा, खुटाळ आणि पडोली या गावांचा काही भाग मिळून सुमारे १३९१.७१ हेक्टर क्षेत्र अधिसूचित करण्यात आले आहे. या भागात वीज पुरवठा, पाणी पुरवठा, रस्ते, भूसंपादन, बगीचे आणि सार्वजनिक सुविधा यांसारखी विविध विकासकामे करण्यात आली आहेत. या योजनेसाठी १९९८ पासून २०२५ पर्यंत प्राधिकरणाकडून एकूण सुमारे ४८३ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून मागील पाच वर्षांतच सुमारे ८७ कोटी रुपयांची कामे करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
योजनेतील काही राखीव जागा शैक्षणिक संस्थांना लिलावाद्वारे देण्यात आल्या असून त्यातून मिळालेला निधी शासनाकडे न जाता म्हाडाकडेच आहे. हा निधी पुन्हा नागपूर म्हाडाकडे वर्ग करून स्थानिक विकासकामांसाठी वापरण्याच्या सूचना दिल्या जाणार असल्याचे राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी स्पष्ट केले.
नवीन चंद्रपूर शहराचे नियोजन अधिक दर्जेदार करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) नियुक्त करण्यात आला असला, तरी आवश्यकतेनुसार अधिक सक्षम आणि अनुभवी नियोजन सल्लागार नियुक्त करण्याचाही विचार केला जाईल. याशिवाय १५५ कोटी रुपयांच्या रस्ते विकास आराखड्याला वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले असून त्यासाठी स्वतः पाठपुरावा करून लवकरात लवकर मंजुरी मिळविण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
नवीन चंद्रपूर शहर विकास योजनेचा पुढील आराखडा अंतिम करण्यासाठी मुंबईत लवकरच उच्चस्तरीय बैठक घेण्यात येणार असून अधिवेशनानंतर १५ दिवसांच्या आत ही बैठक आयोजित केली जाईल. चंद्रपूर शहराचा नियोजित आणि दर्जेदार विकास व्हावा यासाठी गृहनिर्माण विभाग पुढाकार घेणार असल्याचेही राज्यमंत्री डॉ.भोयर यांनी नमूद केले.
