Wednesday, March 11 2026 3:29 pm

शिवभोजन योजनेसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – मंत्री छगन भुजबळ

 

मुंबई, 11 : राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात सकस भोजन उपलब्ध करून देणारी ‘शिवभोजन योजना’ अधिक सक्षमपणे राबवण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे अन्न, नागरी, पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. आमदार सना मलिक यांनी विधानसभेत याविषयाची लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

अन्न नागरी पुरवठा मंत्री भुजबळ म्हणाले की, सध्या संपूर्ण राज्यात १८७३ शिवभोजन केंद्रे कार्यरत आहेत. २०२५-२६ या आर्थिक  वर्षासाठी सुधारित अंदाजपत्रकानुसार ₹२२०.०० कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी देखील ₹१२० कोटींची भरीव तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. हा निधी प्राप्त होताचा मार्चनंतर निधी वितरीत करणार आहे. शिवभोजन योजनेच्या देयकांचे वितरण उप नियंत्रक शिधावाटप, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्या स्तरावर नियमितपणे केले जाते. क्षेत्रीय यंत्रणेला निधी वितरणासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून, लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ निरंतर मिळत राहील याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या प्रश्नाच्या चर्चेत विधानसभा सदस्य अनंत (बाळा) नर यांनी सहभाग घेतला.