मुंबई, 07 : स्ट्रोक सारख्या आजारासाठी शहरी भागात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असून, ग्रामीण भागातही गोल्डन अवर, अचूक व प्रभावी सुविधा उपलब्ध करण्याबाबत उपयुक्त सूचना “महाराष्ट्र स्ट्रोक समिट’च्या माध्यमातून कराव्यात असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ‘इंडियन मेडिकल पार्लमेंट फोरम’च्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्र स्ट्रोक समिट 2026’ या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमास आयएमपीएफचे चेअरमन खासदार डॉ. अनिल बोंडे उपस्थित होते.
स्ट्रोकसारख्या आजारात ‘गोल्डन अवर’मध्ये रुग्णाला उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने टेलिमेडिसिनच्या माध्यमातून शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांचे ग्रामीण भागात मार्गदर्शन उपलब्ध होणे. तसेच 108 रुग्णवाहिकेत न्यूरो व स्ट्रोकसारख्या आजारावर तत्काळ उपचार करण्याच्या अनुषंगाने आधुनिकीकरणाबाबत सूचनांचे स्वागत आहे. ग्रामीण भागातील रुग्णालयात अशा आजाराबाबत काही खाटा आरक्षित ठेवण्याबाबतही विचार विनिमय व्हावा. समिट मधील सूचना व कार्यवाहीच्या अनुषंगाने मंत्रालयात विभागाच्या अधिकाऱ्याची बैठक घेऊन योग्य ते धोरण ठरवता येईल असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्य शासनाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्ट्रोक’ संबंधित आजारासह 2399 आजारांचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश केला. तसेच 2399 आजाराचा समावेश केला असून, पॅकेज मध्ये वाढ केली वाढ केली आहे. नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी शासन आणि तज्ज्ञांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
केईएम रुग्णालयाच्या न्यूरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. नितीन डांगे यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाने महात्मा फुले जनआरोग्य योजनेत स्ट्रोकचा समावेश केल्याबद्दल आरोग्यमंत्री आणि राज्य शासनाचे आभार मानले. खासदार डॉ. अनिल बोंडे म्हणाले, इंडियन मेडिकल पार्लमेंट फोरमच्या वतीने देशभरात स्ट्रोक समिट आयोजित करण्यात येईल. थ्रोम्बोलायसिस व थ्रोम्बेक्टॉमीसारख्या उपचारांचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश केल्याबद्दल त्यांनी राज्य शासनाचे अभिनंदन केले.
केईएम रुग्णालयाचे डॉ. नीरज जैन यांनी स्ट्रोक उपचारा संदर्भात सादरीकरण केले, तर रश्मी सराफ यांनी पक्षघातग्रस्त रुग्णांच्या यशस्वी उपचारांच्या यशोगाथांचे सादरीकरण केले.
या कार्यक्रमाला आयएमपीएफचे सेक्रेटरी विनोद भानू, आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, तसेच विविध वैद्यकीय तज्ज्ञ आणि आरोग्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
