ठाणे 26 :पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर स्मृती प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा प्रतिष्ठान, खोज फाउंडेशन आणि आदर्श स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील महिला सफाई कर्मचाऱ्यांसाठी ‘संत गाडगेबाबा स्वच्छतादूत सन्मान २०२६’ तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम शनिवार, दिनांक ७ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेत स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ हॉल, संकल्प शाळेजवळ, सावरकर नगर, ठाणे येथे पार पडणार आहे.
हा उपक्रम डॉ. मुरहरी केळे यांच्या मार्गदर्शनाखाली, समाजसेवक प्राध्यापक प्रमोद वाघमोडे व इंजिनियर अमोल जगताप यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे. समाजाच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्यांचा गौरव करून त्यांच्या कार्याला कृतज्ञ अभिवादन करण्याचा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
संत गाडगेबाबा यांच्या स्वच्छता व समाजप्रबोधनाच्या विचारांना अभिवादन करत स्वच्छतादूत महिलांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमात मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये सर्वसाधारण आरोग्य तपासणी, रक्तदाब, मधुमेह तपासणी आदी सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर स्मृती प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य या संस्थेचे सचिव प्राध्यापक प्रमोद वाघमोडे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जास्तीत जास्त महिला कर्मचारी व नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा. तसेच समाजहितासाठी इतर सामाजिक संस्थांनीही अशा प्रकारचे उपक्रम हाती घेऊन समाजसेवेची परंपरा अधिक बळकट करावी.
महिला सक्षमीकरण व सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे
