Monday, February 16 2026 9:56 pm

ठाणे महानगरपालिकेच्यावतीने ‘माझी वसुंधरा’ अंतर्गत पर्यावरण जनजागृती व हरित शपथ स्पर्धा 2026 मध्ये ठाणेकरांनी सहभागी व्हावे

 

ठाणे 16 : ठाणे महानगरपालिकेमार्फत ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत पर्यावरण जनजागृती व हरित शपथ स्पर्धा 2026 चे आयोजन करण्यात आले असून ठाणे महानगरपालिका हद्दीतील स्वयंसेवी संस्था, महाविद्यालये, ठामपा व खाजगी शाळांना सहभागी व्हावे असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर व महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

पर्यावरण संवर्धनाबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणे, लोकसहभाग वाढविणे तसेच नाविन्यपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. स्पर्धा दोन टप्प्यांत होणार असून प्रथम टप्प्यासाठी 25 मार्च 2026 पर्यंत तर द्वितीय टप्प्यासाठी 20 ऑगस्ट 2026 पर्यंत माहिती ऑनलाईन सादर करावी लागणार आहे. स्पर्धेचा निकाल 7 सप्टेंबर 2026 रोजी आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिनानिमित्त जाहीर करण्यात येणार आहे.

स्पर्धेत चार गटांचा समावेश असून स्वयंसेवी संस्थांसाठी महापालिका स्तरावर, महाविद्यालयांसाठी परिमंडळ स्तरावर तर ठामपा व खाजगी शाळांसाठी प्रभाग समिती स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्वयंसेवी संस्थांना रील/डॉक्युमेंटरी निर्मिती व हरित शपथ या दोन्ही प्रकारांत सहभाग बंधनकारक असून प्रत्येक टप्प्यात किमान पाच विषयांवरील व्हिडिओ सादर करणे आवश्यक आहे. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांमधून किमान 10 टक्के किंवा 200 ‘पर्यावरण दूत’ निवडून विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवायचे आहेत. शाळांनी किमान एक ते पाच जनजागृती कार्यक्रम आयोजित करून त्याचे जीओ-टॅग छायाचित्रे व सोशल मीडिया लिंक सादर करणे आवश्यक राहणार आहे.

हरित शपथ नोंदणी राज्य शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने करावी लागणार असून ULB मध्ये “Thane Municipal Corporation” निवडणे बंधनकारक आहे. शपथेनुसार कृती पूर्ण केल्यास स्वतंत्र गुण दिले जाणार आहेत. तसेच स्पर्धेसाठी आकर्षक पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. स्वयंसेवी संस्थांसाठी प्रथम क्रमांकास रु. 1 लाख, द्वितीय रु.75 हजार व तृतीय रु. 50 हजार तर उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत. महाविद्यालये व शाळांसाठीही विविध स्तरांवर रोख पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे.

सहभागी संस्था/आस्थापनांनी दोन्ही टप्प्यांत स्वतंत्र माहिती ऑनलाईन सादर करणे आवश्यक असून गुणांकन स्वमूल्यांकन पद्धतीने करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार प्रत्यक्ष पाहणी करून अंतिम गुण निश्चित केले जातील.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी लिंक ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी www.thanecity.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा pcctmc.ho@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.