Sunday, February 15 2026 3:46 pm

परभणीत उबाठाचा मुस्लिमधार्जिणा चेहरा समोर आला

शिवसेना उपनेते संजय निरुपम यांची खरमरीत टीका

मुंबईत खान महापौर करण्याचा छुपा अजेंडा मतदारांनी उधळला

मुंबई,  १३ – परभणी महापालिकेत मुस्लिम महापौर करुन उबाठाचा मुस्लिमधार्जिणा चेहरा जनतेपुढे आला अशी खरमरीत टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी उबाठावर केली. मुंबईत मराठी महापौर बनवण्याचा मुद्दा मराठी मतांसाठी होता का, असा सवाल निरुपम यांनी उपस्थित केला. मुंबईत खान महापौर करण्याचा उबाठाचा छुपा अजेंडा मुंबईकर मतदारांनी उधळून लावला, अशी टीका निरुपम यांनी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, परभणीत उबाठा गटाचे २५ नगरसेवक निवडून आले. परभणी महापालिकेत उबाठाने काँग्रेससोबत युती करुन सय्यद इक्बाल यांना महापौर पदी बसवले. परभणीत मुस्लिम महापौर करुन उबाठाचे मुंबईवर लक्ष असल्याचा उबाठाचा छुपा अजेंडा समोर आला. मुंबई महापालिका निवडणुकीवेळी उबाठा आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन मुंबईचा महापौर फक्त मराठी होईल, असा संकल्प केला होता. मात्र परभणी महापालिकेत उबाठाने मुस्लिम नगरसेवकाला महापौरपदी बसवले, मग मुंबईत मराठी महापौर बनवण्याचा मुद्दा मतांसाठी होता का, असा सवाल निरुपम यांनी यावेळी उपस्थित केला. उबाठाच्या मुस्लिमधार्जिण्या भूमिकेमुळेच मुंबई महापालिकेत मुंबईकर मतदारांनी उबाठाचा पराभव केला, अशी टीका निरुपम यांनी केली. मुस्लिम महापौर केल्यानं निवडणुकीत उबाठाची स्पर्धा एमआयएम, काँग्रेस आणि मुस्लिम पक्ष व संघटनांशी होईल, असे निरुपम म्हणाले.

बाळासाहेबांनी देशभक्त मुस्लिमांना कधीही विरोध केला नाही. भारतावर प्रेम करणारे मुस्लिम आमचे आहेत, असे बाळासाहेब म्हणायचे. उबाठाने बाळासाहेबांचे विचार सोडले. मुस्लिम मतांसाठी काँग्रेसी विचारधारा स्वीकारली अशी टीका निरुपम यांनी केली. मुंबईत आणि महाराष्ट्रात हिंदू समाजाच्या हिताचे रक्षण करणाचे आणि बाळासाहेबांचा वारसा पुढे नेण्याचे काम शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे करत आहेत, असे ते म्हणाले. मुंबईतील बांग्लादेशी घुसखोरांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी निरुपम यांनी यावेळी केली.