‘असुर मर्दिनी पुण्याक्षी अर्थात छत्रदान’ नाट्यप्रयोगातुन उलगडली गाथा कन्याकुमारीची
ठाणे, 11 — ठाण्यातील मालवणी महोत्सवात दशावतारी परंपरेचा जागर करण्यात आला. भारताच्या दक्षिण टोकावरील कन्याकुमारी क्षेत्राची पौराणिक महती उलगडणारा ‘असुर मर्दिनी पुण्याक्षी अर्थात छत्रदान’ या दशावतारी नाट्यप्रयोगाने रसिक मंत्रमुग्ध झाले. वेंगुर्ला तालुक्यातील खानोली येथील खानोलकर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळाने हा भारदस्त प्रयोग सादर केला.
कोकण ग्रामविकास मंडळातर्फे भाजप नगरसेवक सीताराम राणे यांनी स्व. अजितदादा पवार महोत्सव नगरी, शिवाईनगर उन्नती गार्डन मैदान येथे ०८ फेब्रु. पासुन आयोजीत केलेल्या मालवणी महोत्सवामध्ये खवय्यांसह रसिक मंडळींची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. या महोत्सवात मंगळवारी (दि.१० फेब्रु.) कन्याकुमारी क्षेत्राची गाथा उलगडणारे “असुर मर्दिनी पुण्याक्षी अर्थात छत्रदान” हे पौराणिक नाट्यपुष्प वेंगुर्ला, खानोली येथील खानोलकर पारंपारिक नाट्य मंडळ, यांनी सादर केले. भारतात कन्याकुमारी क्षेत्र कसे तयार झाले, बाणदैत्य आणि केतुदैत्य या असुराकडून देवतांना त्रास होऊ लागल्याने भगवान शिवशंकर आणि अन्य देवतांनी पुण्याक्षी हिला कुमारीका ठेवत संकटावर कशी मात केली. त्या असुराचा मृत्यु या कुमारीकेकडून कसा होतो. याची पौराणिक कथा या नाट्यप्रयोगातून उलगडण्यात आली. आजही ती देवी रूपात तिष्ठत दक्षिणेच्या समुद्र किनाऱ्यावरील कन्याकुमारीला स्फटीकमय वाळुत उभी आहे. खानोलकर नाटय मंडळाचे संचालक बाबा मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेल्या या नाट्यप्रयोगात रिद्धी सिद्धी व राजाईच्या भूमिकेत अक्षद देसाई, कुमारिका पुण्याक्षी बनलेले रोशन शिरोडकर आणि लक्ष्मीच्या भूमिकेतील ओंकार सावंत यांनी आपल्या अलौकिक सौंदर्याने रसिकांना भुरळ घातली. लक्ष्मण उर्फ पप्पु नांदोस्कर यांनी बाणदैत्य, पप्पु साटम यांनी केतुदैत्य हे क्रुर दानव साकारले तर, नारद बनलेल्या भरत मेस्त्री यांनी सुश्राव्य भजनांचा नजराणा पेश केला. गणपतीची भूमिका शंकर केरकर यांनी, सतीश केळुस्कर यांचा इंद्र देवता, जानु वरक यांचा विष्णु, अक्षय सातार्डेकर शंकर आणि नंदी बनलेले सखाराम केळजी यांनी रसिकांना साक्षात ईश्वराची अनुभुती दिली. यासोबतच शंकर धुरी व चेतन मेस्त्री यांनी भुत बनुन रंगमंचावर थरार साकारला. पप्पु घाडीगावकर यांनी हार्मोनियम, बाबा मेस्त्री आणि तातेश मेस्त्री यांनी पखवाज वादन तर, आकाश खानोलकर या तालरक्षकाने ढोलकी – पखवाजासोबत ठेका धरून दशावतारी नाटय प्रयोगामध्ये उत्तम साथसंगत केली.
देवी पुण्याक्षीचे तेजस्वी रूप, बाणदैत्य या असुरांवर मिळवलेला विजय आणि छत्रदानाची कथा प्रभावी संवाद, पौराणिक वेशभूषेमुळे दशावतारी नाट्यपरंपरेतील अभिनय, गायन व नृत्य यांचा सुरेख संगम पाहायला मिळाला. एकप्रकारे मालवणी लोककलेची समृद्ध परंपरा जपणाऱ्या मालवणी महोत्सवात प्रेक्षकांना दशावतारी नाटकातुन पौराणिक कथानकासोबतच सांस्कृतिक वारशाची अनुभूती लाभली. नाट्यप्रयोगानंतर उपस्थित रसिकांनी तमाम कलाकारांचे टाळ्यांच्या गजरात कौतुक केले
