विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा
ठाणे 20:- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी जिल्ह्यातील सद्यस्थितीतील मतदार संख्या, मतदान केंद्रांची रचना आणि आगामी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या विविध टप्प्यांची सविस्तर माहिती दिली.
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी माहिती देताना सांगितले की, सध्या ठाणे जिल्ह्यात एकूण मतदार संख्या ७४ लाख ७२ हजार २७० इतकी आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ३९ लाख ५६ हजार ५८६ तर महिला मतदारांची संख्या ३५ लाख १४ हजार २१८ एवढी आहे. याशिवाय जिल्ह्यात १ हजार ४६६ इतर मतदार, १ हजार १६ अनिवासी भारतीय (NRI) मतदार, २ लाख ५ हजार ३२९ तरुण मतदार (वय १८-१९), ४० हजार ८२ दिव्यांग मतदार आणि ५२ हजार २२० ज्येष्ठ नागरिक (वय ८५ वर्षांपेक्षा जास्त) मतदारांची नोंद आहे. जिल्ह्याचा सरासरी जेंडर रेशिओ ८८८ इतका असून, १४६-ओवळा माजिवडा हा ५ लाख ७२ हजार ९५८ मतदारांसह जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार असलेला मतदारसंघ ठरला आहे, तर सर्वात कमी मतदार १४१-उल्हासनगर मतदारसंघात असून तेथे २ लाख ९४ हजार ३१४ मतदार आहेत.
मतदान केंद्रांच्या रचनेबाबत बोलताना जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी स्पष्ट केले की, जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण ६ हजार ८९४ मूळ मतदान केंद्र आहेत. मतदारांच्या सोयीसाठी ही केंद्र वेगवेगळ्या ठिकाणी नियोजित करण्यात आली असून, यामध्ये २ हजार २६७ पदनिर्देशित ठिकाणी ६ हजार ८९४ मूळ मतदान केंद्रांची व्यवस्था असेल. या रचनेत पक्क्या इमारतीमधील मतदान केंद्रांची संख्या ४ हजार ६७० असून, १ हजार २३१ केंद्र पार्टिशनमध्ये, ४०४ केंद्र मंडपामध्ये, ३३७ केंद्र सोसायट्यांमध्ये आणि २५२ केंद्र झोपडपट्टी बहुल भागात म्हणजेच स्लम क्लस्टरमध्ये उभारली जाणार आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक ५१८ मतदान केंद्र १३९-मुरबाड मतदारसंघात असून, सर्वात कमी २६० मतदान केंद्र १४१-उल्हासनगर मतदारसंघात आहेत.
आगामी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या वेळापत्रकाची माहिती देताना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले की, या कार्यक्रमासाठी १ ऑक्टोबर २०२६ हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला आहे. या मोहिमेची पूर्वतयारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि आवश्यक छपाईचे काम २० जून ते २९ जून २०२६ या कालावधीत पूर्ण केले जाईल. त्यानंतर ३० जून ते २९ जुलै २०२६ या काळात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बीएलओ मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेटी देणार आहेत. या घरभेटी दरम्यान प्रत्येक मतदाराला ‘एन्यूमरेशन फॉर्म’च्या दोन प्रती दिल्या जातील, ज्यातील एक प्रत मतदाराची किंवा कुटुंबप्रमुखाची स्वाक्षरी घेऊन बीएलओमार्फत संकलित केली जाईल आणि दुसरी प्रत पोचपावती म्हणून मतदाराला दिली जाईल.
प्रशासकीय प्रक्रियेनुसार २९ जुलै २०२६ पर्यंत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण केले जाईल आणि ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. नागरिकांना आपल्या दावे व हरकती ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दाखल करता येतील, तर या सर्व दावे-हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया ३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण केली जाईल. सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर ७ ऑक्टोबर २०२६ रोजी ठाणे जिल्ह्याची अंतिम मतदार यादी अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाणार आहे. ज्या मतदारांची माहिती पूर्वीच्या डेटाबेसशी किंवा सन २००२ च्या मतदार यादीशी जुळणार नाही, त्यांना मतदार नोंदणी अधिकाऱ्यांमार्फत सुनावणीची नोटीस दिली जाईल आणि अशा मतदारांना त्यांच्या जन्माच्या वर्षाच्या वर्गवारीनुसार (उदा. १ जुलै १९८७ पूर्वी, किंवा त्यानंतरचे कालखंड) आवश्यक असणारे अधिकृत दस्तऐवज जसे की जन्म दाखला, पासपोर्ट, शैक्षणिक प्रमाणपत्र, आधार कार्ड किंवा जात प्रमाणपत्र सादर करावे लागेल. मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि सर्वसमावेशक बनवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आणि पात्र मतदारांनी या प्रक्रियेत प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.
