आठ दिवसांत 1524 होर्डिंग्ज हटविले, पाचजणांवर गुन्हे दाखल
ठाणे 22 : ठाणे महानगरपालिकेने शहरातील अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स, फ्लेक्स आणि होर्डिंग्जविरोधात महापालिकेने व्यापक मोहीम हाती घेतली. महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार शहराचे विद्रूपीकरण रोखण्याच्या उद्देशाने अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाने संपूर्ण महापालिका हद्दीत विशेष मोहिम राबविली. 13 ते 20 जुलै या आठ दिवसांच्या मोहिमेत तब्बल 1524 अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स, फ्लेक्स व होर्डिंग्ज हटविण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पाच फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तीन हात नाका येथील पादचारी पुलावर लावण्यात आलेला अनधिकृत वाढदिवसाचा बॅनर 13 जुलै रोजी कोसळल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या होत्या. महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार सर्व प्रभाग समिती हद्दीत कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान विनापरवानगी जाहिराती उभारणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेत महापालिकेने फौजदारी कारवाईही केली. त्यानुसार नौपाडा-कोपरी प्रभाग समिती क्षेत्रात दोन, तर दिवा प्रभाग समिती क्षेत्रात तीन अशा एकूण पाच फौजदारी गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.
अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स आणि फ्लेक्समुळे शहराचे विद्रूपीकरण होण्याबरोबरच पादचारी आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होतो. विशेषतः सार्वजनिक ठिकाणी, उड्डाणपूल, पादचारी पूल, चौक आणि प्रमुख रस्त्यांवर विनापरवानगी लावण्यात येणाऱ्या जाहिराती अपघातांना कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे अशा प्रकारच्या अनधिकृत जाहिरातींविरोधात सातत्याने कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
प्रभागसमिती निहाय करण्यात आलेल्या कारवाईचा तपशील
* नौपाडा-कोपरी प्रभाग समिती – 383
* वागळे प्रभाग समिती – 115
* लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती – 178
* वर्तकनगर प्रभाग समिती – 66
* माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती – 240
* उथळसर प्रभाग समिती – 64
* कळवा प्रभाग समिती – 142
* मुंब्रा प्रभाग समिती – 36
* दिवा प्रभाग समिती – 300
