Thursday, July 23 2026 1:36 am

रखडलेल्या मूळ रहिवाशांची आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव

ठाणे 22 : सुभाषनगर येथे अनेक वर्षे रखडलेल्या एसआरए योजनेत बोगस रहिवाशांची नावे घुसविण्यात आल्याचा आरोप होत असून त्याची चौकशी करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. तसेच अनेक वर्षे भाडे थकलेल्या मूळ रहिवाशांना न्याय देण्यासाठी पुढील आठवड्यात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती श्री. केळकर यांनी दिली.

भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित ११३व्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात सुभाष नगर येथील रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनानुसार या भागात एसआरए प्रकल्प सुरू असून रहिवासी इतरत्र भाड्याने राहत आहेत. मात्र विकासकाने रहिवाशांना दोन-तीन वर्षे भाडेच दिलेले नसून बांधकामही सुरू झालेले नाही. विशेष म्हणजे या योजनेत सुमारे ४०० ते ५०० रहिवाशांची बोगस नावे घुसविण्यात आल्याचा आरोप मूळ रहिवाशांनी केला आहे.

याबाबत बोलताना श्री.केळकर यांनी सांगितले की, फसवणूक होत असलेल्या रहिवाशांना दिलासा देण्यासाठी पुढील आठवड्यात एसआरए अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असून बोगस रहिवाशांप्रकरणी देखील चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. एका विकासकाच्या विरोधात तर चार तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याने वेळीच योग्य पावले उचलली नाहीत तर रहिवाशांना सोबत घेऊन आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हे दाखल करू, असा इशारा श्री.केळकर यांनी दिला. नागरीकांची फसवणूक करणाऱ्या विकासकांवर एमपीआयडी अंतर्गत कारवाई करण्यासाठी अधिवेशनात मागणी केली असून नुकतीच वर्तकनगर येथील म्हाडा रहिवाशांची फसवणूक करणाऱ्या विकासकाला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे विकासकांनी रहिवाशांना वेळीच दिलासा द्यावा तसेच एसआरए अधिकाऱ्यांनी देखील विकासकाशी हातमिळवणी न करता रहिवाशांसाठी काम करावे, असा टोलाही श्री.केळकर यांनी दिला आहे.

कार्यक्रमात पॉंजी स्कीममध्ये फसवणूक झालेल्या पुण्यातील गुंतवणूकदारांनी देखील उपस्थित राहून निवेदन दिले. या योजनेत ठाणे, पुण्यासह विविध शहरांतील १३०० नागरिकांची फसवणूक झाली असून सुमारे १८० कोटींचा घोटाळा झाला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने कंपनीची मालमत्ता जप्त केली असली तरी त्यातून सर्व ठेवीदारांची रक्कम परत मिळणार नाही. त्यामुळे पुढील काळात पाठपुरावा करून ठेवीदारांना दिलासा देण्यासाठी प्रयत्नशील राहीन, असे श्री.केळकर यांनी सांगितले.

या कार्यक्रमात ज्ञानेश्वरनगर येथील रहिवाशांनी अनेक वर्षे भेडसावणाऱ्या दूषित पाण्याची तक्रार मांडली. याबाबत मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असल्याचे सांगून मुंबईला ज्या जलवाहिनीतून शुद्ध पाणी मिळते, त्या जलवाहिनीतून जोडणी करून ज्ञानेश्वरनगर परिसराला पाणीपुरवठा करण्यात यावा, अशा सूचना श्री.केळकर यांनी केल्या. दरम्यान जोपर्यंत शुद्ध पाणी मिळत नाही तोपर्यंत जन आंदोलन सुरूच ठेवा, असा सल्लाही त्यांनी रहिवाशांना दिला आहे.

या कार्यक्रमात माजी उपमहापौर अशोक भोईर, नगरसेवक अमित सरय्या, सुरज दळवी, योगेश भंडारी, अजित मोरे आदी उपस्थित होते.