Thursday, May 21 2026 4:59 am

भटक्या कुत्र्यांसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केले स्वागत 

ठाणे 20 – आजारी आणि मानवासाठी धोकादायक असलेल्या भटक्या कुत्र्यांना इंजेक्शन देऊन मारले जाऊ शकते, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. भुतदया आणि प्राणीदया ही मानवाची संवेदनशील मानसिकता असली तरी मनुष्यजीव हा त्या मानाने अधिक मोठा असल्याने सुप्रिम कोर्टाच्या या निर्णयाचे खासदार नरेश म्हस्के यांनी स्वागत केले आहे.
मंगळवारी अंतिम निकाल देताना, सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणांहून भटके कुत्रे हटवण्याच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. याविषयी प्रतिक्रिया देतांना खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, कुत्र्यांपासून मानवी जीवनाचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे. भटके कुत्रे चावल्यानंतर कोवळ्या जीवांना रेबिजची लागण झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. यावर उपचार घेताना प्रचंड वेदाना सहन कराव्या लागतात तर काही वेळेला काहींचे जीव देखिल गेले आहेत. न्यायालयाने शाळा, रुग्णालये, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आणि क्रीडा संकुल यांसारख्या सार्वजनिक ठिकाणांवरून भटक्या कुत्र्यांना हटवण्याचे निर्देश कायम ठेवले आहेत. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्गाला कुत्र्यांच्या धोक्यापासून मुक्ती मिळून भीतीमुक्त वावर करता येणार आहे. काही प्राणीप्रेमी संघटनांनी या पूर्वी नागरिकांच्या त्रासाचा आजवर विचारच केला नव्हता हे खेदजनक होते. लहान मुलांवर होणारे कुत्र्यांचे हल्ले अत्यंत चिंताजनक आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करत असल्याचे नरेश म्हस्के यांनी सांगितले. तसेच या संदर्भातील कायदा अधिक सक्त करण्याची संसदेत मी मागणी करणार असल्याचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले.