ठाणे 22 : सद्यस्थितीत तीव्र उन्हाळा असल्याने पाणी पुरवठ्याची मागणी वाढलेली आहे त्यामुळे काही इमारती व गृहसंकुलामधून टँकरची मागणी येत आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने नागरिकांसाठी स्वतंत्र टँकर भरणा केंद्र सुरू केले असून टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
ठाणे महापालिका हद्दीतील सात प्रभाग समित्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी साकेत येथे एकच टँकर भरणा केंद्र कार्यान्वित आहे. मात्र, येथे मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याने नागरिकांना वेळेत टँकरने पाणी पुरवठा करणे शक्य होत नव्हते. विशेषतः घोडबंदर रोड परिसरासाठी स्वतंत्र टँकर भरणा केंद्र ब्रह्मांड जलकुंभ येथे सुरू करण्यात आले आहे.
या टँकर फिलिंग स्टेशनमधून ठामपा / खाजगी टँकरमार्फत नागरिकांना आवश्यकतेनुसार पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. महापालिकेच्या नियमांनुसार शुल्क आकारून टँकर सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून, नागरिकांनी संबंधित सोसायटीच्या लेटरहेडवर मागणीपत्र सादर करणे आवश्यक आहे. या पत्रावर कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांच्या स्वाक्षऱ्या तसेच पाणी पुरवठ्याबाबतची आवश्यक माहिती देणे बंधनकारक राहणार आहे.
महापालिकेकडून उपलब्ध करून देण्यात येणारे टँकर हे फक्त घरगुती वापरासाठी असतील. टॉयलेट, बाथरूम फ्लशिंग किंवा बांधकामासाठी या पाण्याचा वापर करता येणार नाही. महापालिकेच्या मा. सर्वसाधारण सभेत झालेल्या निर्णयानुसार महापालिकेने निश्चित केलेल्या दरानुसार 10 हजार लिटर क्षमतेच्या टँकरसाठी महापालिका टँकर व वाहतुकीसह दर 1000 रुपये निश्चित करण्यात आला आहे. स्वतःच्या खासगी टँकरमध्ये घरगुती वापरासाठी 10 दहा हजार लीटर पाणी भरण्यासाठी प्रति फेरा 700 रुपये तर व्यावसायिक वापरासाठी फक्त पाणी भरण्याचा दर 1500 रुपये निश्चित करण्यात आला आहे.
तसेच टँकर मालकांनी निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक शुल्क आकारल्यास नागरिकांनी पाणी पुरवठा विभागाकडे तक्रार केल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने नमूद केले आहे.
