ठाणे 15 – श्री गणेश कल्चरल अकॅडमी, ठाणे यांच्या वतीने प्रख्यात कथ्थक गुरू महामहोपाध्याय डॉ. सौ. मंजिरी श्रीराम देव यांच्या गुरूंच्या स्मरणार्थ ३२व्या ‘गोपीकृष्ण संगीत महोत्सवा’चे आयोजन शनिवार, दिनांक ३१ ऑक्टोबर आणि रविवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२६ रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे करण्यात आले आहे.
प्रख्यात नर्तक आणि कथ्थक गुरू पं. गोपीकृष्ण यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणारा हा महोत्सव भारतीय शास्त्रीय संगीत आणि कथ्थक नृत्याची समृद्ध परंपरा जपणारा महत्त्वपूर्ण सांस्कृतिक उपक्रम आहे. यंदाच्या महोत्सवात नामवंत कलाकारांच्या सादरीकरणातून संगीत आणि नृत्याचा सुरेल संगम रसिकांना अनुभवता येणार आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी रात्री ८.१५ वाजता तबलावादक ओजस अधिया यांचे तबलावादन आणि कथ्थक नृत्यांगना दुर्गा आर्या यांचे कथ्थक नृत्य सादर होणार आहे.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, रविवार, १ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.१५ वाजल्यापासून प्रख्यात शास्त्रीय गायिका मंजुषा पाटील यांचे गायन आणि पद्मश्री पं. तेजेंद्र नारायण मजुमदार यांचे सरोदवादन सादर होणार आहे. सरोदवादनासाठी पं. मुकुंदराज देव यांची तबल्यावर साथसंगत लाभणार आहे. याशिवाय, कथ्थक नृत्यांगना विधा लाल आणि गौरी दिवाकर यांची कथ्थक जुगलबंदी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.
या महोत्सवात तबल्यावर रोहित देव, पखवाजवर महावीर गंगाणी, गायनासाठी श्रीरंग टेंबे आणि वैभव मंकड, हार्मोनियमवर सिद्धेश बिचोलकर व शुधांशू घारपुरे, तर सितारवर झुबेर शेख यांची साथ लाभणार आहे.
भारतीय शास्त्रीय संगीत आणि कथ्थक नृत्याच्या रसिकांनी या महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून नामवंत कलाकारांच्या सादरीकरणाचा आनंद घ्यावा, असे आवाहन श्री गणेश कल्चरल अकॅडमी, ठाणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
