ठाणे, 08 – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सांस्कृतिक अभिव्यक्ती विभाग यांच्या वतीने ३ आणि ४ ऑक्टोबर २०२६ रोजी “गीत व पथनाट्य प्रशिक्षण शिबिर” संपन्न झाले. ठाणे, मुंबई, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी व पालघर या सहा जिल्ह्यांतील ४८ प्रशिक्षणार्थींनी शिबिरात सहभाग घेतला. मनोरंजनातून प्रबोधन आणि प्रबोधनातून परिवर्तन’ हा मूलमंत्र देत महा अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले.
पथनाट्याचे प्रशिक्षण अभिनेता, दिग्दर्शक व लेखक दामोदर कोळी यांनी, तर चळवळीतील गीतांचे प्रशिक्षण सांस्कृतिक अभिव्यक्ती विभागाचे राज्य कार्यवाह अनिल शोभना वसंत आणि युवा सहभाग विभागाच्या राज्य कार्यवाह प्रियांका खेडेकर यांनी दिले. शिबिरात आवाजाची तयारी, लय-ताल सराव, गायन, शरीरभाषा, स्व-शोध, पथनाट्याचे संवाद, तालीम आणि पथनाट्य व गीतांचे सादरीकरण अशा विविध सत्रांतून प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले. शिबिराचे सूत्रसंचालन रुपेश यांनी केले, तर प्रियांका सवाखंडे यांनी आभार मानले. सांस्कृतिक अभिव्यक्ती विभागाचे राज्य सहकार्यवाह सचिन गोवळकर यांनी सहभाग घेतला. समितीच्या राज्य सरचिटणीस आरती नाईक यांनी उपस्थित राहून मनोगत व्यक्त केले.या शिबिराच्या आयोजनात ठाणे जिल्ह्यातील साथी डॉ. सुषमा बसवंत, किरण ईशी, ज्योती मेश्राम, छाया गायकवाड, ॲड. प्रज्ञा चव्हाण, मंगल मोरे, दिवेंद्र मोरे, पिराजी सातपुते तसेच रायगड जिल्ह्यातील संदीप गायकवाड, विकास वल्हे व प्रियांका सवाखंडे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
शिबिराची सुरुवातही अतिशय अर्थपूर्ण पद्धतीने झाली. एका वाळलेल्या झाडावर वेगवेगळ्या कलांचे प्रतिनिधित्व करणारी पाने लावण्यात आली. भारूड, एकांकिका, पथनाट्य, मूकनाट्य अशा विविध कलांचे प्रतीक असलेली ही पाने त्या वाळलेल्या झाडावर चिटकवून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. जणू काही वाळलेल्या झाडाला कलेच्या माध्यमातून पुन्हा नवी पालवी फुटत असल्यासारखं ते दृश्य होतं.
दामोदर कोळी यांनी दिग्दर्शित केलेल्या या शिबिराच्या सुरुवातीलाच कलेची ओळख आणि कला कशी निर्माण होते, यासाठी एक ॲक्टिव्हिटी घेण्यात आली. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या आणि वापरात नसलेल्या वस्तू एकत्र करून त्यापासून एक कलाकृती तयार करण्याचं टास्क देण्यात आलं. प्रत्येकाने आपल्या कल्पनेतून सुंदर कलाकृती निर्माण केली. त्यामध्ये वाळलेल्या झाडावर उमललेलं एक फूल विशेष लक्षवेधी ठरलं. षषयानंतर संवादाच्या माध्यमातून पिकासो यांनी तयार केलेली काही चित्रे सहभागींळ साथींसमोर मांडण्यात आली. कलेचे वेगवेगळे प्रकार, प्रत्येक कलेच्या मागे असणारा विचार आणि एखादी कलाकृती निर्माण होताना कलाकाराची भूमिका यावर चर्चा झाली. कला ही केवळ सादरीकरणाची गोष्ट नसून, तिच्यामागे विचार, अनुभव आणि अभिव्यक्ती असते, याचा अनुभव या प्रक्रियेतून घेता आला.या दोन दिवसांमध्ये कलाकार, कार्यकर्ता आणि समाज यांच्यातील नात्याचा प्रवास समजून घेण्याचा प्रयत्न झाला. स्वशोध, निसर्गसंवाद, नाटक, मेडिटेशन, नाटकाचे नियम, चर्चा आणि नाट्यसादरीकरण अशा विविध विषयांवर नाटकाच्या संदर्भाने चर्चा आणि उपक्रम घेण्यात आले. स्वतःकडे पाहणं, आजूबाजूच्या जगाकडे संवेदनशीलतेने पाहणं आणि त्या अनुभवाला कलेच्या माध्यमातून अभिव्यक्त करणं, या प्रक्रियेतून नाटकाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी मिळाली.
शिबिराच्या शेवटच्या दिवशी पाच गटांनी वेगवेगळ्या विषयांवर प्रभावी सादरीकरण केलं. अंधश्रद्धा आणि अफवा, अंधश्रद्धा परंपरा, अंधश्रद्धा भीती, अंधश्रद्धा भोंदूगिरी आणि अंधश्रद्धा आणि स्त्री अशा विविध पाच विषयांना नाटकाच्या माध्यमातून मांडण्यात आले. प्रत्येक गटाने आपापल्या विषयाला सादरीकरणातून प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला. यासोबतच गीतांचे सादरीकरणही झाले.गीत प्रशिक्षणामध्ये सांस्कृतिक अभिव्यक्ती विभागाचे अनिल शोभना वसंत आणि युवा सहभाग विभागाच्या कार्यवाह प्रियंका खेडेकर यांनी प्रभावी पद्धतीने मार्गदर्शन केले. गाण्याचा सराव, आवाज मोकळा करण्यासाठीचे उपक्रम, ताल आणि समूहामध्ये गीत सादरीकरण अशा विविध गोष्टींचा सराव या दोन दिवसांत झाला. शेवटच्या दिवशी झालेल्या गीत सादरीकरणातून या प्रशिक्षणाचा सुंदर अनुभव घेता आला.
हे शिबिर सर्व साथींसाठी काहीसं नवीन पण खूपच उपयुक्त होते. त्याचे एक कारण म्हणजे या शिबिरात वेगवेगळ्या वयोगटातील साथी सहभागी झाली होती. त्यामुळे त्यांच्यासोबत संवाद साधताना, अनुभव ऐकताना आणि एकत्रितपणे विविध उपक्रम करताना शिबिराला एक वेगळीच रंगत आली.कलेच्या माध्यमातून स्वतःला समजून घेणं, समाजाकडे पाहणे आणि आपल्या विचारांना अभिव्यक्ती देणे, या सगळ्याचा अनुभव या दोन दिवसांत घेता आला. त्यामुळे हे दोन दिवस केवळ प्रशिक्षणाचे न राहता, शिकण्याचे, संवादाचे आणि स्वतःला नव्याने समजून घेण्याचे ठरले. दोन दिवस संपले पण या शिबिरातून मिळालेले अनुभव आणि संवाद नक्कीच पुढच्या कलाप्रवासात सर्वांच्या सोबत राहतील. नॉलेज पार्क, मोहाडीकर फार्म हाऊस, भोईरवाडी, कर्जत येथे झालेलं हे दोन दिवसांचं शिबिर खूप अर्थपूर्ण आणि अनुभवसमृद्ध ठरले.
