मुंबई, 29: जून राज्यातील शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र व सुरक्षित स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, वीज व सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन यांसह मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वेक्षण करून पुढील चार ते सहा महिन्यांत आवश्यक बांधकामे पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत दिले. विधानपरिषद सदस्य चित्रा वाघ यांनी राज्यातील शाळांमधील मुलींसाठी स्वतंत्र व सुरक्षित स्वच्छतागृहांच्या उभारणीबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
या चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री भोयर यांनी सांगितले की, यू-डायस पोर्टलवरील माहिती शाळांमधील शिक्षक व मुख्याध्यापकांकडून भरली जाते आणि त्याच आधारे आकडेवारी तयार होते. शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृहे, वीजपुरवठा तसेच किशोरवयीन मुलींसाठी सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन उपलब्ध करून देणे आवश्यक असून यासाठी नवीन सर्वेक्षण केले जाणार आहे. काही शाळांमध्ये लायब्ररी रूम, मुलींची तसेच मुलांची स्वच्छतागृहे अद्याप उपलब्ध नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
या सुविधा उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा निधी तसेच विविध शासकीय व सामाजिक निधींचा उपयोग करून सुविधा निर्माण करण्यात येतील, असेही राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले.
