मुंबई,29 : शालेय शिक्षण विभागातील डिजिटल कामकाज अधिक सक्षम करण्यासाठी सदस्यांनी मांडलेल्या सूचनांचा विचार करून आवश्यक सुधारणा करण्यात येतील. यासाठी स्वतंत्र बैठक आयोजित केली जाईल अशी माहिती राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
याबाबत सदस्य सत्यजित तांबे यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य संजय भेंडे यांनी उपप्रश्न उपस्थित केला.
राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले, शालेय शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणावर डिजिटलायझेशन झाले असून, काळानुरूप आवश्यक तांत्रिक सुधारणा सातत्याने करण्यात येत आहे. डिजिटलायझेशनच्या कामात कोणत्याही तांत्रिक अडचणी नसून, वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडीसंदर्भातील प्रकरणांमध्ये विहित कार्यपद्धतीनुसारच कामकाज केले जात आहे. ई-ऑफिस प्रणालीमुळे अभिलेखांचे जतन, सनियंत्रण आणि प्रत्येक नस्तीचा मागोवा ठेवणे अधिक सुलभ झाले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे विभागाचे प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा स्वतः आढावा घेणार असून, ज्या प्रकरणांमध्ये दोषी आढळतील त्यावर कोणतीही तडजोड न करता आवश्यक ती कारवाई केली जाईल, असेही राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी स्पष्ट केले.
