“खरीप हंगामात रासायनिक खताचे लिंकिंग होणार नाही याची दक्षता घ्या” – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ
ठाणे,25 : जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा संनियंत्रण समितीची सभा दि. 22 एप्रिल 2026 रोजी जिल्हाधिकारी, ठाणे डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे संपन्न झाली.
या सभेस समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, सहअध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रामेश्वर पाचे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, कृषी विकास अधिकारी मुनीर बाचोटीकर, मोहीम अधिकारी महेश बनकर, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक बालाजी शिंदे, विस्तार अधिकारी (कृषि) बी. डी. जावीर, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक नितीन जाधव, राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्सचे उपव्यवस्थापक विकास कांबळे, ठाणे जिल्हा ऍग्रो डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष समीर ठाकरे तसेच कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी सदस्य सचिव मुनीर बाचोटीकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून सभेच्या कामकाजास सुरुवात केली. ठाणे जिल्ह्यात सध्या 174 किरकोळ व 22 घाऊक खत विक्री केंद्र, 156 बियाणे विक्री केंद्र तसेच 152 कीटकनाशक विक्री केंद्र कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली. रासायनिक खतांची विक्री ePOS मशीनद्वारे तसेच बियाण्यांची विक्री ‘साथी’ पोर्टलद्वारे केली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यासाठी एकूण 180 ePOS मशीन प्राप्त झाली असून त्यापैकी 154 खत विक्री केंद्रांना वितरित करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. ठाणे जिल्ह्यासाठी अनुदानित रासायनिक खतांचा पुरवठा आरसीएफ कंपनीमार्फत करण्यात येत आहे. खरीप हंगाम 2026 साठी जिल्ह्यास 11,550 मेट्रिक टन खत साठा मंजूर झाला असून त्यामध्ये 9,700 मेट्रिक टन युरिया व 1,500 मेट्रिक टन सुफला खताचा समावेश आहे. याशिवाय 850 मेट्रिक टन युरिया व 10 मेट्रिक टन डीएपीचा संरक्षित साठाही मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 20 गोदामांमध्ये एप्रिल अखेर 80 टक्के व 10 मेपर्यंत 100 टक्के खत साठा पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सभेत सांगण्यात आले.
सभेत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी येणाऱ्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने विविध बाबींवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या. खतांचे लिंकिंग होणार नाही याची दक्षता घेणे, घाऊक विक्री केंद्रांची नियमित तपासणी करणे, शेतकऱ्यांमध्ये विशिष्ट ब्रँडचा आग्रह निर्माण होऊ नये यासाठी प्रबोधन करणे, कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणे, विक्री केंद्रांच्या खरेदी-विक्री नोंदी व साठ्याची पडताळणी करणे यावर भर देण्यात आला.
तसेच बोगस खते, बियाणे व कीटकनाशकांच्या विक्रीवर कठोर कारवाई करावी, खतांच्या बेकायदेशीर वाहतुकीवर नियंत्रण ठेवावे, तसेच खत पुरवठा सर्व भागांत समप्रमाणात होईल याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. खत वाहतुकीसाठी पुरेशा वाहनांची उपलब्धता ठेवण्याबाबतही आरसीएफ कंपनी व संबंधित पुरवठादारांना निर्देश देण्यात आले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी माती परीक्षण अहवालानुसार शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा यासाठी गावागावांत शेतकरी मेळावे आयोजित करण्याच्या सूचना दिल्या. तसेच खतांच्या वाहतुकीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यकतेनुसार पोलीस विभागाची मदत घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
सभेच्या शेवटी मोहीम अधिकारी महेश बनकर यांनी उपस्थितांचे आभार मानून सभा संपन्न झाल्याचे जाहीर केले.
