Sunday, March 22 2026 10:26 pm

निवडणूक प्रक्रियेवर 330 सी.सी.‍ टिव्ही कॅमेऱ्याची करडी नजर

निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये, स्ट्राँग रूम, ईव्हीएम कमिशनिंग, साहित्य वाटप केंद्र कॅमेऱ्यात कैद

ठाणे 02 – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत निवडणूक अधिकारी यांची कार्यालये, स्ट्राँग रूम, ईव्हीएम कमिशनिंगचे ठिकाण, साहित्य वाटपाची ठिकाणे, संवेदनशील व अति संवेदनशील मतदान केंद्रे, मतमोजणीचे ठिकाणे, मुख्य स्ट्रॉंग रुम, चेक पोस्ट आदीवर काटेकोर लक्ष ठेवण्याकरीता आणि निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता व सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी आत्तापर्यंत एकूण 330 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले असून आवश्यकतेनुसार अजून कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी नमूद केले.

निवडणूक प्रक्रियेकरीता लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरांचे सर्व कामकाज हे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या मार्गदशनाखाली सुरु असून नोडल अधिकारी म्हणून उपायुक्त मनिष जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रभागनिहाय स्ट्राँग रूम व निवडणूक निर्णय अधिकारी (आरओ) कार्यालयांमध्ये कॅमेरे बसविण्यात आले असून त्यामध्ये माजिवडा–मानपाडा प्रभाग कार्यालय व न्यू होरायझान स्कूल, हिरानंदानी इस्टेट येथील स्ट्रॉंग रुम 52, वर्तकनगर – 43, लोकमान्यनगर – 31, वागळे आयटीआय 25, नौपाडा–कोपरी कार्यालय व ठाणा कॉलेज येथील स्ट्रॉंग रुम 26, उथळसर 24, कळवा प्रभाग कार्यालय व सह्याद्री शाळा येथील स्ट्राँग रूम या ठिकाणी मिळून 12, कॅमेरे मुंब्रा (26–31 प्रभाग) 21, मुंब्रा (30–32 प्रभाग) 19, दिवा (27-28 प्रभाग) 17 तसेच दिवा (29-33 प्रभाग) – 25 कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या सर्व ठिकाणी मिळून 295 कॅमेरे सद्यस्थितीत कार्यरत आहेत.

याशिवाय मुख्य स्ट्रॉंग रुम (डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, बेथनी हॉस्पीटलच्या बाजूला) येथे 30 कॅमेरे, प्रभाग निहाय वाटप करण्यात येणारे मुख्य साहित्य वाटपाचे ठिकाण हे टाऊन हॉल असून या वाटप केंद्रावर 1 कॅमेरा, तर मॉडेला चेक पोस्ट नाका येथे 2 कॅमेरे आणि श्रीनगर चेक पोस्ट नाक्यावर 2 कॅमेरे बसविण्यात आले असून एकूण आत्तापर्यंत कार्यान्वित असलेल्या सीसीटीव्ही कॅमेराची संख्या 330 इतकी आहे.

स्ट्राँग रूममध्ये ठेवलेल्या ईव्हीएम मशिन्सच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक प्रभागात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. स्ट्राँग रूममधील कॅमेऱ्यांचे थेट निरीक्षण करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांना स्वतंत्र युजर आयडी व पासवर्ड देण्यात आले असून या संपूर्ण व्यवस्थेवर उपायुक्त मनिष जोशी यांचे लक्ष आहे.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरांवर अखंड लक्ष ठेवण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार कंत्राटदाराकडून आणखी नवीन कॅमेरे लावून ते कार्यान्वित करण्यासाठी एकुण 11 निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयनिहाय ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाकडील 11 भूमापकांची निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयनिहाय नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या संपूर्ण तांत्रिक यंत्रणेवर देखरेखीसाठी उपायुक्त मनीष जोशी यांचे मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता वामन सखदेव, कार्यकारी अभियंता शशिकांत साळुंखे आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी उपअभियंता अतुल भोळे यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.

कमांड सेंटर कार्यान्वित करणार

याशिवाय ठाणे महानगरपालिका मुख्य कार्यालय येथे मुख्य कमांड सेंटर हे देखील कार्यान्वित करण्यात येणार असून, या मुख्य कमांड सेंटर मध्ये आत्तापर्यंत लावण्यात आलेल्या विविध कॅमेरांचे लाईव्ह स्ट्रीमिंग देखील दृश्य स्वरुपात पाहता येणार आहे.

या सर्व व्यापक उपाययोजनांमुळे निवडणूक प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक व विश्वासार्ह होणार असल्याचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी आयुक्त सौरभ राव नमूद केले.