Thursday, February 5 2026 6:03 pm

महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांसाठी मुदतवाढ

गरजू महिला, ५ वी ते १२ वीच्या मुली व विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुला–मुलींसाठी ४ वैयक्तिक लाभाच्या योजना
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ जानेवारी २०२६
ठाणे, 02 – – महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने जिल्ह्यातील पात्र गरजू महिला, ५ वी ते १२ वीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना तसेच विविध क्षेत्रांत विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुला–मुलींसाठी ४ वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येत असून, या योजनांसाठी १ जानेवारी २०२६ ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

या योजनांचा मुख्य उद्देश ग्रामीण व दुर्गम भागातील महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, मुलींचे शिक्षण सुलभ करणे, तंत्रज्ञानाधारित कौशल्य विकासास प्रोत्साहन देणे तसेच विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ देणे हा आहे.

योजनांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे —
१) महिलांना स्वयंरोजगारासाठी विविध साहित्य पुरविणे
ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील पात्र महिलांना स्वयंरोजगारासाठी शिलाई मशीन, घरघंटी (पीठाची गिरणी), पिको फॉल मशीन तसेच तत्सम साहित्याचा लाभ देण्यात येणार आहे.
• अनुदान मर्यादा :
o साहित्याच्या एकूण किंमतीच्या ९०% किंवा
o घरघंटी / पिको फॉल मशीनसाठी कमाल ₹२०,०००/-
o शिलाई मशीनसाठी कमाल ₹६,५००/-
• अनुदानाची रक्कम थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने आधार संलग्न बँक खात्यावर जमा करण्यात येईल.
२) इयत्ता ५ वी ते १२ वीपर्यंत शिकणाऱ्या मुलींना सायकल पुरविणे
ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थिनींना शिक्षणासाठी ये–जा सुलभ व्हावी, या उद्देशाने शाळा ते घराचे अंतर किमान २ कि.मी. असलेल्या मुलींना सायकलचा लाभ दिला जाणार आहे.
• अनुदान मर्यादा :
o सायकलच्या एकूण किंमतीच्या ९०% किंवा
o कमाल ₹६,५००/-
• अनुदानाची रक्कम DBT द्वारे आधार संलग्न बँक खात्यावर जमा केली जाईल.
३) इयत्ता ७ वी ते १२ वी पास मुलींना संगणक प्रशिक्षण शुल्क
१ जानेवारी २०२४ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत संगणक प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या मुलींनी प्रशिक्षण उत्तीर्ण प्रमाणपत्र सादर केल्यानंतर नियमानुसार संगणक प्रशिक्षण शुल्काचा लाभ देण्यात येईल.
• अनुदान मर्यादा : प्रति लाभार्थी कमाल ₹५,०००/-
• रक्कम DBT पद्धतीने आधार संलग्न बँक खात्यावर जमा केली जाईल.
४) विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुला–मुलींचा सत्कार व आर्थिक मदत
राज्यस्तरावर कला, क्रीडा व अन्य क्षेत्रांत विशेष प्राविण्य मिळविलेल्या १८ वर्षांखालील मुला–मुलींचा सत्कार करून त्यांना इयत्ता १० वी व १२ वी नंतरच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
• अनुदान मर्यादा : ₹२०,०००/- (अक्षरी रुपये वीस हजार मात्र)
अर्ज प्रक्रिया
या सर्व योजनांसाठी इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://zpthaneschemes.com या लिंकवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने १५ जानेवारी २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत.

अर्ज प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक व सोपी असून, योजनांचे सविस्तर तपशील, पात्रता निकष तसेच आवश्यक कागदपत्रांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

“जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पात्र गरजू महिला तसेच मुला–मुलींनी या योजनांचा लाभ घ्यावा. शासनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याचा उपयोग करून स्वयंरोजगार व शिक्षणाच्या माध्यमातून सक्षमतेकडे वाटचाल करावी. अर्ज वेळेत सादर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे आवाहन महिला व बाल विकास विभागाचे प्रमुख जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री. संजय बागुल यांनी केले आहे.

जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने पात्र लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने अर्ज करून या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.