Thursday, February 5 2026 1:26 pm

ठाण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य; महिला जिल्हाप्रमुख मिनाक्षी शिंदेंचा राजीनामा

शाखाप्रमुखावर निलंबनाची कारवाई ठरली कारण?

विभव बिरवटकर

ठाणे 25 – ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असतानाच, शिवसेना (शिंदे गट) मध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख तथा माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने पक्षातील वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या समर्थक असलेल्या एका शाखाप्रमुखावर पक्षविरोधी कार्य केल्याच्या आरोपाखाली निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतरच हा राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मध्ये मानपाडा, मनोरमानगर व आझादनगर परिसराचा समावेश होतो. या प्रभागातून मिनाक्षी शिंदे या यापूर्वी निवडून आल्या होत्या. याच प्रभागातून ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांचे बंधू भूषण भोईर हे मागील निवडणुकीत निवडून आले आहेत. मिनाक्षी शिंदे आणि भोईर यांच्यातील मतभेद यापूर्वीही अनेकदा चर्चेत आले असून, या प्रभागात दोन स्वतंत्र गट निर्माण झाल्याचे चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर भोईर यांच्या जागी स्थानिक पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याला संधी देण्यात यावी, अशी मागणी शिंदे गटातील काही कार्यकर्त्यांकडून होत होती. काही दिवसांपूर्वी मिनाक्षी शिंदे यांचे समर्थक असलेले शाखाप्रमुख विक्रांत वायचळ यांनीही ‘बाहेरील उमेदवार नको, स्थानिकच उमेदवार हवा’ अशी उघड भूमिका मांडली होती. यामुळे त्यांनी भूषण भोईर यांच्याविरोधात अप्रत्यक्षपणे सूर लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.

याच पार्श्वभूमीवर पक्षविरोधी कार्य केल्याचा ठपका ठेवत शिवसेना (शिंदे गट) चे सचिव संजय मोरे यांनी विक्रांत वायचळ यांना शाखाप्रमुख पदावरून निलंबित केले. या कारवाईनंतर अवघ्याच काही वेळात मिनाक्षी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून आपल्या पदाचा राजीनामा दिला.

राजीनाम्याच्या पत्रात वैयक्तिक कारणांचा उल्लेख करण्यात आला असला, तरी समर्थक शाखाप्रमुखावर झालेल्या कारवाईमुळेच त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा शहरात रंगली आहे. या घटनेमुळे ठाण्यात शिंदे गटातील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे.

दरम्यान, या संदर्भात मिनाक्षी शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.