राज्यभरातील हजारो युवकांच्या उपस्थितीत युवसेनेचा महायुवौत्सव २०२६ वार्षिक संमेलन संपन्न
मुंबई, 20 : युवासेनेच्या संघटनात्मक विस्तारासाठी आणि युवासेनेला नवी दिशा देण्यासाठी शिवसेनेचे मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे साहेब आणि युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि युवासेना कार्याध्यक्ष श्री. पुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात आज युवासेनेचे वार्षिक संमेलन “महायुवौत्सव २०२६” राज्यभरातून आलेल्या हजारो तरुणांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात वरळी डोम येथे संपन्न झाले.
यावेळी उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे साहेब मार्गदर्शन करताना म्हणाले, आज महायुवौत्सवमध्ये राज्यातील गावागावातून युवा सैनिक सहभागी झाले आहेत. शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून युवासेना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचली आहे. ही बाब अत्यंत अभिमानास्पद आहे.
युवासेना ही एक विचारसरणी आहे. युवासेना अन्यायाविरुद्ध , मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढणारी संघटना आहे. आपण लोकांचा विश्वास प्रमाण मानून काम करतो. क्रांती घडवण्याची ताकद ही तरुणांमध्ये असते. युवासेना मराठी माणसाच्या हक्कासाठी, न्यायासाठी, त्यांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न करत आहे. अन्यायाविरुद्ध लढणारी ताकद आहे त्याचा मला सार्थ अभिमान आहे, असे कौतुकोद्गार शिंदे साहेबांनी काढले.
युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे युवासैनिकांशी संवाद साधला. आज अभिमान वाटतो की, गेल्या चार वर्षांत शिवसेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली युवासेना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. शिवसेनेची ताकद आज महाराष्ट्रात वाढली असून, युवासेना हीच पुढची शिवसेना आहे. राजकारणाची पार्श्वभूमी नसतानाही अनेक युवकांना युवासेनेने सक्षम नेतृत्व दिले आहे. याचा प्रत्यय युवासेना सचिवांकडे पाहून येतो. आजच्या युवासेनेचा आम्हाला मला प्रचंड अभिमान आहे, असे कौतुक श्रीकांत शिंदे यांनी केले.
यावेळी युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी युवासैनिकांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्रातील प्रत्येक गावातून आज या ठिकाणी युवा सैनिक आला आहे. आज हे हजारो तरुण शिवसेनेचे मुख्य नेते मा. ना. एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एकवटले आहेत.
आपण आम्हा युवा सैनिकांवर दाखवलेला विश्वासामुळे आम्हाला ताकद मिळाली त्यामुळे यापुढेही असेच आम्ही काम करत राहू, असा विश्वास पुर्वेश सरनाईक यांनी व्यक्त केला. या महाराष्ट्रात जर कुठली युवा संघटना असेल तर ती एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली असणारी युवासेना आहे. ही नेत्यांची संघटना नाहीतर कार्यकर्त्यांची संघटना आहे, असे ही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात महायुवौत्सवामध्ये उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते युवासेनेच्या अधिकृत वेबसाइटचे अनावरण करण्यात आले, तसेच सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ आणि युवासेनेचे नवीन प्रेरणादायी गीत प्रदर्शित करण्यात आले. तसेच अंमली पदार्थांच्या विरोधात कार्य करण्यासाठी युवा स्क्वॉड या नव्या उपक्रमाचे अनावरण करण्यात आले. तसेच शिवसेनेचे मुख्य नेते मा. एकनाथ शिंदे साहेबांच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करून शिंदे साहेबांना युवा सैनिकांच्यावतीने अनोखी भेट देण्यात आली.
