Thursday, May 28 2026 9:33 pm
latest

शहरातील प्रत्येक घराची नोंद होईल या दृष्टीने काळजीपूर्वक घरगणना करावी – आयुक्त सौरभ राव

उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करण्याच्या आयुक्तांच्या सूचना

ठाणे (28 : ठाणे महानगरपालिका हद्दीत 16 मे पासून घरगणनेसाठी प्रगणक घराघरामध्ये भेटी देत असून प्रभाग समितीनिहाय सुरू असलेल्या घरगणना प्रक्रियेचा आढावा ‍आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतला. 14 जून 2026 पर्यत 100 टक्के घरगणना पूर्ण होईल, यामध्ये कोणतेही घर गणने शिवाय सुटणार नाही, त्या दृष्टीने आवश्यकता भासल्यास अतिरिकत् मनुष्यबळ वाढविण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित सहाय्यक आयुक्तांना बैठकीत दिल्या.

या बैठकीस उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, मधुकर बोडके,दिनेश तायडे, दीपक झिंजाड, डॉ. मिताली संचेती तसेच सर्व प्रभाग समितीचे सहायक आयुक्त व कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

ठाणे शहरातील नऊ प्रभाग समितीनिहाय 5284 घर गट तयार करण्यात आले असून त्या अंतर्गत अंदाजे 7 लाख 34 हजार 496 इतकी घरांची संख्या आहे. घरगणनेसाठी संपूर्ण ठाणे शहरात 5323 प्रगणक, 852 पर्यवेक्षक काम करीत असल्याची माहिती उपायुक्त मधुकर बोडके यांनी दिली. सद्यस्थितीत ठाणे महापालिका क्षेत्रात 40 टक्के घरगणनेचे काम पूर्ण झाले आहे. 14 जून 2026 पर्यत 100 टक्के घरगणना पूर्ण होणे आवश्यक असून त्या दृष्टीने सर्व सहायक आयुक्त प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.

बैठकीत विविध प्रभागांमधील घरजनगणनेच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. काही ठिकाणी मनुष्यबळ, तांत्रिक अडचणी येत असतील तर त्यावर त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. 14 जून 2026 पर्यत 100 टक्के काम पूर्ण होण्यासाठी 30 मे 2026 पर्यत 70 टक्के घरगणनेचे काम होईल हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सर्व सहायक आयुक्तांनी काम करावे अशा सूचनाही आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीत दिल्या.

घरगणना हे काम राष्ट्रीय कर्तव्य असून या कामासाठी नियुक्त करण्यात आलेले प्रगणक, पर्यवेक्षक यांनी काळजीपूर्वक हे काम करावे, हे काम अत्यंत महत्त्वाचे असून प्रत्येक घराची अचूक नोंद होणे आवश्यक असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले व सदयस्थितीत सुरू असलेल्या कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.