Thursday, May 28 2026 9:33 pm
latest

जिल्हा आरोग्य विभागाकडून गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमाला गती

ठाणे जिल्ह्यातील ४ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ४ उपकेंद्रांना राष्ट्रीय स्तरावरील NQAS मानांकन

ठाणे, 28 : जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार, सुरक्षित, पारदर्शक व रुग्णकेंद्री आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागामार्फत गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या National Quality Assurance Standards (NQAS) अंतर्गत जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांच्या सेवा गुणवत्ता वृद्धीसाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत असून, त्याला सकारात्मक यश मिळत आहे.

ठाणे जिल्ह्यातील ४ प्राथमिक आरोग्य केंद्रांनी राष्ट्रीय स्तरावरील NQAS गुणवत्ता मानांकन प्राप्त केले आहे. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र वज्रेश्वरी, खरबाव, धसई आणि शेणवा या केंद्रांचा समावेश आहे. तसेच ४ उपकेंद्रांनीही राष्ट्रीय स्तरावरील NQAS मानांकन प्राप्त करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यामध्ये बापगाव, खांबला, भिणार आणि काटई या उपकेंद्रांचा समावेश आहे.

याशिवाय जिल्ह्यातील १० उपकेंद्रांनी राज्यस्तरीय NQAS गुणवत्ता मानांकन प्राप्त केले आहे. यामध्ये वडूनवघर, उसगाव, एकलहरे, कान्होर, नडगाव, बिरवाडी, शिरगाव, दापोडे, लाप आणि दोहोळे या उपकेंद्रांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमधून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा अधिक प्रभावी, शिस्तबद्ध आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी NQAS अंतर्गत विविध निकषांवर आधारित मूल्यांकन प्रक्रिया राबविण्यात येते. स्वच्छता, रुग्ण सुरक्षा, औषध उपलब्धता, वेळेवर सेवा, प्रशिक्षित मनुष्यबळ, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन, नोंद व्यवस्थापन तसेच रुग्ण समाधान यांसारख्या बाबींवर विशेष भर दिला जात आहे.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांसाठी सविस्तर गुणवत्ता निकष निश्चित करण्यात आले आहेत. जिल्हा गुणवत्ता आश्वासन कक्षामार्फत प्राथमिक मूल्यांकन करण्यात येते. प्राथमिक मूल्यांकनात ७० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या संस्थांना राज्यस्तरीय मूल्यांकनासाठी पाठविण्यात येते. त्यानंतर राज्यस्तरीय मूल्यांकनात आवश्यक गुण प्राप्त करणाऱ्या संस्थांची राष्ट्रीय गुणवत्ता मानांकनासाठी शिफारस करण्यात येते.

सन २०२६ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील सर्व स्तरांवरील आरोग्य संस्थांना NQAS मानांकन प्राप्त करून देण्याचे उद्दिष्ट जिल्हा आरोग्य विभागाने ठेवले असून, उर्वरित आरोग्य संस्थांना गुणवत्ता निकषांनुसार सज्ज करण्याचे काम वेगाने सुरू आहे.

या उपक्रमामुळे आरोग्य सेवांबाबत नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होत असून, ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांनाही दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मदत होत आहे. जिल्हा आरोग्य विभागामार्फत नियमित प्रशिक्षण, मार्गदर्शन, आढावा बैठक आणि अंतर्गत गुणवत्ता तपासणीद्वारे संस्थांचा दर्जा उंचावण्यावर सातत्याने भर दिला जात आहे.

“गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा ही नागरिकांची मूलभूत गरज आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांनी प्राप्त केलेले राष्ट्रीय व राज्यस्तरीय NQAS मानांकन हे आरोग्य विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समर्पित कार्याचे प्रतीक आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद ठाणे प्रशासन कटिबद्ध असून, आगामी काळात अधिकाधिक आरोग्य संस्थांना गुणवत्ता मानांकन प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न अधिक गतीने सुरू ठेवले जातील,” असे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी सांगितले.