ठाणे, 14 : “क्रीडा स्पर्धा या केवळ जिंकणे-हरणे यापुरत्या मर्यादित नसतात, तर त्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा महत्त्वाचा भाग असतात. मैदानावर शिकलेली शिस्त, संघभावना, परिश्रम आणि संयम हीच तत्वे आयुष्यात पुढे यशस्वी होण्यासाठी आधारस्तंभ ठरतात.” “प्रत्येक विद्यार्थ्याने आयुष्यात एक स्पष्ट ध्येय निश्चित केले पाहिजे. ध्येय निश्चित केल्यानंतर त्यासाठी सातत्याने मेहनत घेतली, तर यश नक्की मिळते असे वक्तव्य महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी येथे केले.
ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित मध्यवर्ती क्रीडा महोत्सव २०२५-२६ च्या बक्षीस वितरण सोहळ्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, उपायुक्त मिताली संचेती, नगरसेवक अनिल भोर, राकेश शिंदे,नगरसेविका कांचन चिंदरकर, शीतल ढमाले उपस्थित होते.
महापौरांनी स्वतः ठाणे महानगरपालिका शाळा क्र. 33 च्या विद्यार्थिनी असल्याचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. त्या म्हणाल्या, “मी देखील याच महापालिका शाळेत शिकले आहे. या शाळांनी मला घडवले. त्यामुळे कोणतीही पार्श्वभूमी असली तरी जिद्द आणि मेहनत असेल, तर मोठी स्वप्ने पूर्ण करता येतात. महापालिका शाळांमधील विद्यार्थी कोणत्याही बाबतीत कमी नाहीत.”
दोन दिवस सुरू असलेल्या या क्रीडामहोत्सवाच्या उद्घाटनास नगरसेवक दिलीप बारटक्के यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेवक राकेश शिंदे, नगरसेविका शीतल ढमाले, उपायुक्त मिताली संचेती, शिक्षणाधिकारी शेषराव बडे तसेच राष्ट्रीय पातळीवरील मल्लखांब खेळाडू कौशिक राजगुरू उपस्थित होते.
शाळा क्र. 13 व 41 च्या विद्यार्थिनींनी सुरेल ईशस्तवन व स्वागत गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजाला मानवंदना म्हणून वर्तकनगर गटातील शाळा क्र. 120 व 03 मधील विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन केले. मानपाडा गटातील शाळा क्र. 25 च्या विद्यार्थ्यांनी रिबीन कवायत, तर कळवा गटातील शाळा क्र. 69 व 115 च्या विद्यार्थ्यांनी डंबेल्स कवायत सादर केली. किसननगर गटातील शाळा क्र. 38 व 42 च्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक लेझीम सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
महानगरपालिकेच्या एकूण 102 शाळांमधील विभागीय क्रीडा स्पर्धा पूर्वी पार पडल्या होत्या. आठ गटांतील विजयी संघांचे कबड्डी, खो-खो अंतिम सामने तसेच वैयक्तिक स्पर्धा दिवसभरात पार पडल्या. शिक्षकांसाठी खो-खो स्पर्धा घेण्यात आल्याने या क्रीडा महोत्सवाला वेगळे वैशिष्ट्य लाभले.
सांस्कृतिक सादरीकरणांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. शाळा क्र. 23 (इंग्रजी माध्यम) च्या विद्यार्थ्यांनी मानवी मनोरे (पिरामिड्स) सादर केले. शाळा क्र. 44, वर्तकनगरच्या विद्यार्थ्यांनी एरोबिक्स, कोपरी गटातील शाळा क्र. 18 च्या विद्यार्थ्यांनी तालबद्ध लेझीम, तर शाळा क्र. 53 च्या विद्यार्थ्यांनी लोकनृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मान्यवरांच्या हस्ते सर्व विजयी संघांना ट्रॉफी व बक्षिसे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमास प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री. सुनील फापाळे, ठाणे पालघर शिक्षक पतपेढीचे संचालक श्री. जगन्नाथ जाधव तसेच शिक्षक सेनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन शिक्षणाधिकारी शेषराव बडे व गटाधिकारी संगीता बामणे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती क्रीडा महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष संतोष दळवी, उपकार्याध्यक्ष सुनील साळुंखे, चिटणीस रविंद्र सकपाळ, सहचिटणीस वर्षा मटकर,. शेख आफाक अहमद, राजेंद्र बामणे, यूआरसी प्रमुख रविंद्र पाटील,. मुश्ताक पठाण व इतर पदाधिकाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडले. रविंद्र सकपाळ यांनी आभार प्रदर्शन केले. सविता शिंदे यांच्या ‘वंदे मातरम्’ गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. सलग दोन दिवस चाललेल्या या क्रीडा महोत्सवाचे सूत्रसंचालन सुरेश पाटील व सविता चौधरी यांनी प्रभावीपणे केले.
एकूणच, उत्साह, शिस्त आणि क्रीडाभावनेने ओतप्रोत भरलेला हा मध्यवर्ती क्रीडा महोत्सव संस्मरणीय ठरला.
