Friday, October 9 2026 3:55 am

विद्यार्थी पालकांना खेळातून आरोग्याचा संदेश!

व्हीपीएमच्या सौ. ए. के. जोशी इंग्रजी माध्यम शाळेचे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने उपक्रम

ठाणे,08 मोबाईल आणि दैनंदिन धावपळीच्या जीवनशैलीत कुटुंबासोबत खेळण्यासाठी वेळ मिळणे दिवसेंदिवस कमी होत असताना, ठाण्याच्या विद्याप्रसारक मंडळाच्या सौ. ए. के. जोशी इंग्रजी माध्यम शाळेने पालक आणि विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून एकत्र आणत ‘खेळूया, निरोगी राहूया आणि कुटुंबासोबत आनंदी जीवन जगूया’ असा आरोग्यदायी संदेश दिला. शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित पालक-विद्यार्थी क्रीडा महोत्सवाला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

व्ही. पी. एम.च्या बेडेकर कॉलेजच्या टर्फवर २ ऑक्टोबर रोजी माध्यमिक विभागासाठी, तर ४ ऑक्टोबर रोजी पूर्व-प्राथमिक आणि प्राथमिक विभागासाठी सकाळी सात वाजल्यापासून दिवसभर क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विविध नावीन्यपूर्ण क्रीडा उपक्रमांमध्ये विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत खेळाचा मनमुराद आनंद लुटला. कार्यक्रमाचे उद्घाटन व्ही. पी. एम.चे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांच्या हस्ते झाले. विशेष म्हणजे डॉ. बेडेकर यांचे संपूर्ण कुटुंबही या उपक्रमात सहभागी झाले होते. डॉ. अभिजित बापट, डॉ. मृदुला बापट, व्ही.पी.एमचे सदस्य अभय मराठे आणि माजी अधिष्ठाता कालिंदी कोल्हटकर यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती. यावेळी डॉ. महेश बेडेकर यांनी विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधत नियमित व्यायाम, शारीरिक सक्रियता आणि कुटुंबाच्या आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच या उपक्रमाचे नियोजन केल्याबद्दल सुशील इनामदार, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अंजना कपूर आणि पूर्व-प्राथमिक विभागाच्या प्रमुख अपर्णा वरुडकर यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.