ठाणे 08 – रिंग रेल्वेच्या मार्गात बदल करावा या प्रमुख मागणीसाठी ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट येथील रोडज एन्क्लेव्ह गृहसंकुलातील रहिवासी रविवारी रस्त्यावर उतरले. यावेळी त्यांनी हातात बॅनर, होर्डिंग घेत शांततापूर्ण आंदोलन केले.
केंद्र शासनाच्या माध्यमातून ठाण्यात रिंग रेल्वे मेट्रो प्रकल्पाची उभारणी होत आहे. हिरानंदानी रोडज एन्क्लेव्ह गृहसंकुल आणि टीसीएस यांच्या मधील रस्त्यावरुन हि मेट्रो धावणार आहे. यामुळे येथील रहिवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. आराखड्यानुसार पूर्वी टीसीएसच्या मागून कोस्टल रॅडने हि मेट्रो जाणार होती मात्र अचानक यात बदल करून ती रहिवासी भागातून धावणार आहे. यामुळे येथील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. या गृहसंकुलात एकूण १८ बहुमजली इमारती आहेत. यासाठी ५ मूळचे प्रवेशद्वार आहेत. मेट्रोमुळे यातील तीन दरवाजे बंद करावे लागणार आहेत. एका प्रवेशद्वारावर एक शाळा आहे. यांमुळे दुर्देवाने एखादी दुर्घटना घडल्यास बाहेर पडण्यास रहिवाशांना मुश्किल होणार आहे. या आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी रविवारी या गृहसंकुलातील रहिवासी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. शांततापूर्ण मार्गाने यावेळी मूक आंदोलन करण्यात आले. मेट्रो आराखड्यानुसार पूर्वीचाच असावा, आमचा मेट्रोला विरोध नाही अशी भूमिका रहिवाशांनी व्यक्त केली.
