Saturday, July 4 2026 12:05 am
latest

रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून नैसर्गिक शेतीला व्यापक चालना – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, 03: राज्यातील शेतकऱ्यांचे रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला व्यापक चालना देण्यासाठी शासन कटिबद्ध असून, आगामी काळात पाच लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिली. सदस्य सचिन कल्याणशेट्टी यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेच्या सूचनेला उत्तर देताना त्यांनी शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती सभागृहात मांडली.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, राज्यातील शेती व्यवस्था मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांवर अवलंबून आहे. मागील पाच वर्षांत राज्यात दरवर्षी सरासरी ६९ लाख मेट्रिक टन रासायनिक खतांचा वापर झाला असून, त्यापैकी खरीप हंगामात सुमारे ४३ लाख मेट्रिक टन आणि रब्बी हंगामात २६ लाख मेट्रिक टन खतांचा वापर होतो. सन २०२५-२६ मध्ये राज्यात ७४.६५ लाख मेट्रिक टन खतांचा वापर झाला असून, रासायनिक खतांचा वाढता वापर ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

देशातील खतांच्या आयातीबाबत त्यांनी सांगितले की, देशाला लागणाऱ्या युरियापैकी सुमारे २० टक्के, डीएपीपैकी ५० टक्के, तर एमओपी (पोटॅश) खताची १०० टक्के आयात करावी लागते. युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर पुरवठा साखळीवर परिणाम होत असला तरी राज्यात सध्या खतांची कोणतीही कमतरता नसून केंद्र सरकारकडून मंजूर आवंटनानुसार पुरेसा पुरवठा होत असल्याचे त्यांनी सांगितले.

नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनचे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानात विलीनीकरण करण्यात आले असून, सन २०२६-२७ पासून ‘महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान’ राबविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात २०१९ च्या पशुगणनेनुसार २२.९६ लाख देशी गाई होत्या, तर २०२४ च्या पशुगणनेत ही संख्या २०.१९ लाखांवर आली आहे. ही घट लक्षात घेऊन शासनाने उच्च उत्पादनक्षम देशी गाई तयार करण्यासाठी राज्यात सहा भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा सुरू केल्या आहेत. तसेच मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेतून देशी गाईंचे भ्रूण, गीर व साहिवाल जातींचे १०० टक्के अनुदानावर लिंगविभाजित वीर्य, तसेच देशी दुभत्या गाईंचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

पुणे येथे स्थापन करण्यात आलेल्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रामार्फत खिल्लार, देवणी, लाल कंधारी, गवळाऊ, डांगी, कोकण कपिला, गीर, साहिवाल, राठी, थारपारकर आणि लाल सिंधी या देशी जातींचे संवर्धन, संशोधन आणि तंत्रज्ञान विकासाचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.