Friday, July 3 2026 10:52 pm
latest

दूध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळीविरोधात कारवाई तीव्र करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

मुंबई, 03 : राज्यातील दूध व दुग्धजन्य पदार्थांसह अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत कारवाई अधिक प्रभावी करण्यात येत असून मनुष्यबळाची कमतरता दूर करणे, नवीन प्रयोगशाळा कार्यान्वित करणे आणि जिल्हास्तरावरील यंत्रणा बळकट करण्यासाठी शासन आवश्यक पावले उचलत आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेतील अर्धा तास चर्चेला उत्तर देताना दिली.

सदस्य हेमंत ओगले यांनी उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना मंत्री झिरवाळ म्हणाले की, दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी सक्षम कायदे अस्तित्वात आहेत. आता रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया गतीने सुरू असून अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात भरती करण्यात आली आहे.

राज्यात सध्या मुंबई, संभाजीनगर, पुणे आणि नागपूर येथे प्रयोगशाळा कार्यरत असून यवतमाळ, नाशिक आणि रायगड येथे नवीन प्रयोगशाळा उभारण्याचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्हास्तरावर अन्न व औषध प्रशासनाची कार्यालये अधिक सक्षम करण्यासाठी शासकीय कार्यालयांच्या परिसरात नागरिकांना सहज उपलब्ध होतील अशा ठिकाणी कार्यालये सुरू करण्याचा विचार सुरू आहे.

मंत्री झिरवाळ यांनी दूध भेसळीविरोधात अधिक कठोर कायदेशीर उपाययोजनांचा अभ्यास करण्यात येत असल्याचे यावेळी सांगितले. गुटखा प्रकरणांप्रमाणे कठोर कारवाईसंदर्भात कायदेशीर पर्यायांचा विचार केला जाईल तसेच दूध भेसळीविरोधातील स्वतंत्र कायद्याचा मसुदा अधिक प्रभावी करण्यासाठी पुनरावलोकन करण्यात आले असून तो लवकरच पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. भेसळमुक्त अन्नपदार्थ नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी विद्यमान कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करणे हीच सर्वात प्रभावी उपाययोजना असल्याचे नमूद करत मंत्री झिरवाळ यांनी अन्न सुरक्षा आणि ग्राहकांच्या आरोग्य संरक्षणासाठी शासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.

या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सुरेश धस यांनी सहभाग घेतला.