ठाणे, 01 :- महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यातील नागरिकांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी आणि ग्रामस्तरावर सर्वसमावेशक आरोग्य सेवा बळकट करण्याच्या उद्देशाने “माझं गाव, आरोग्य संपन्न गाव” हे महत्त्वाकांक्षी अभियान दि. 1 एप्रिल 2026 पासून पुढे वर्षभर 31 मार्च 2027 पर्यंत राज्यासह ठाणे जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार आहे.
या अभियानाचा मुख्य उद्देश प्रत्येक नागरिकाला प्रतिबंधात्मक, सुलभ, गुणवत्तापूर्ण व सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून देत निरोगी, सक्षम आणि जागरूक ग्रामीण समाज निर्माण करणे हा आहे. “प्रजा निरोगी, तर राज्य सशक्त” या तत्त्वज्ञानावर आधारित हे अभियान ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येणार असून लोकसहभागाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे.
या अभियानांतर्गत संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी करणे, माता व बालमृत्यू दरात घट करणे, पोषण, स्वच्छता व शुद्ध पाणी यावर भर देणे, तसेच नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती करणे यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. यामध्ये क्षयरोग, कुष्ठरोग, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांबरोबरच मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करोग यांसारख्या असंसर्गजन्य आजारांवरही प्रभावी नियंत्रण ठेवण्याचे उद्दिष्ट आहे.
तसेच, 30 वर्षावरील नागरिकांची असंसगर्जन्य आजार (मधुमेह, उच्चरक्तदाब, कर्करोग) नियमित आरोग्य तपासणी, गर्भवती महिलांची 100% नोंदणी व तपासणी, बालकांचे संपूर्ण लसीकरण, तसेच पोषण सुधारणा यांसाठी ठोस उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.
आरोग्य सेवांसोबतच स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, मानसिक आरोग्य आणि जीवनशैली सुधारणा यांनाही समान प्राधान्य हे अभियान केवळ आरोग्य तपासणीपुरते मर्यादित नसून, ग्रामविकासाच्या सर्व घटकांना एकत्र आणणारे व्यापक व्यासपीठ ठरणार आहे.
ग्रामपंचायत, आरोग्य संस्था, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवी संस्था आणि ग्रामस्थ यांचा सक्रिय सहभाग यात अपेक्षित आहे.
या अभियानाची अंमलबजावणी 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत केली जाईल. प्रत्येक ग्रामपंचायतीने 1 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत नोंदणी करणे आवश्यक राहील.
अभियानादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना “आरोग्य संपन्न ग्राम म्हणून गौरविण्यात येणार असून त्यांना पुरस्कार व प्रमाणपत्र देण्यात येईल.
राज्य, विभाग, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर विविध बैठका, मेळावे, रॅली. जनजागृती उपक्रम आणि आरोग्य शिबिरे आयोजित करून अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. यामध्ये विविध विभागांमधील समन्वयावर विशेष भर देण्यात आला आहे.
‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान आरोग्य क्षेत्रातील एक लोकचळवळ ठरणार असून प्रत्येक नागरिकाने यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून आपले गाव आरोग्यदृष्ट्या सक्षम बनवावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले आहे.
