शिवव्याख्याते नितीन बानगुडे-पाटील यांचे प्रतिपादन
ठाणे, ९: हिंदवी स्वराज्य उभारताना छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक मोहीम व भविष्याचे सूक्ष्म नियोजन केले होते. त्यांच्या कारकिर्दीतील प्रत्येक मोहीम ही वेगवेगळी नीती व युक्ती आणि वेगवेगळ्या शूर सरदारांमुळे यशस्वी ठरली. अन्, इतिहासात अमर झाली, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक व शिवव्याख्याते नितीन बानगुडे-पाटील यांनी येथे केले.
सुयश कला-क्रीडा मंडळाच्या वतीने कोपरीतील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या प्रांगणात सलग २२ व्या वर्षी व्याख्यानमाला भरविण्यात आली होती. या व्याख्यानमालेचे तिसरे व अखेरचे पुष्प शिवव्याख्याते नितीन बानगुडे-पाटील यांच्या `शिवचरित्र’ व्याख्यानाने झाले. त्यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी स्मिती सावंत हिने शिवगर्जना दिली.
या वेळी मंडळाचे अध्यक्ष मधुसुदन संजीवा, कार्यवाह सतीश सावंत, पदाधिकारी समीर चव्हाण, अनंता सुर्वे, गुरु स्वामी, अंजन दांडेकर, शिरीष अनाप, सुभाष नाईक, अशोक तांबे यांचीही उपस्थिती होती. या कार्यक्रमाला शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शिवसेनेच्या नगरसेविका नम्रता हेमंत पमनानी, संजय सावंत यांच्यासह मान्यवरांनी भेट दिली. या वेळी मंडळाला वैद्यकीय कार्यक्रमांसाठी मोलाचे सहकार्य करणाऱ्या डॉ. जी. जी. शर्मा यांचा सत्कार करण्यात आला.
छत्रपती शिवरायांनी अवघ्या ३५ वर्षांत ७५० वर्षांचे पारतंत्र्य हटवले. तसेच शून्यातून लोककल्याणकारी हिंदवी स्वराज्याची उभारणी केली. १६४६ मध्ये तोरणा जिंकल्यानंतर आई जगदंबेच्या आशीर्वादाने एकापाठोपाठ एक किल्ले व मोहीमा जिंकण्यात ते यशस्वी ठरले, असे ते म्हणाले.
अफजलखान, सिद्धी जौहर यांच्यासह शत्रूंची मानसिकता व प्रत्येक छोट्या-मोठ्या बाबींचा विचार करीत छत्रपती शिवरायांनी मोहीमा यशस्वी केल्या. त्यांना माणसांची पारख व निरख होती. त्यामुळे तुटपुंजे सैन्य दल व साधने असतानाही, बलाढ्य सत्तेबरोबर ते झुंजले. अफजलखानाच्या पराभवानंतर हाती आलेले घोडे व हत्तींना स्वराज्यात सामील करण्यात आले. मात्र, अफजलखानाचा वध करण्यापूर्वीच दोन महिने आधी महाराजांकडून दोन हजार मावळ्यांना घोडेस्वारीचे प्रशिक्षण देण्यात आले होते. एवढे सूक्ष्म नियोजन व भविष्याचा विचार महाराजांकडून केला जात होता, असे बानगुडे-पाटील यांनी सांगितले. अफजलखानाच्या वधानंतर पुढील २० दिवसांत छत्रपती शिवरायांनी २०० किलोमीटर परिसरातील १८ किल्ले जिंकून घेतले होते. त्यांचा झंझावात पाहण्याशिवाय विजापूरकरांना पर्याय राहिला नव्हता. विशेष म्हणजे महाराजांच्या बहुतांशी मोहीमा या स्वराज्याच्या सीमेवर झाल्या. त्यामुळे स्वराज्यातील नागरिकांना युद्धाचा फटका बसला नव्हता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
जगभरात सर्वाधिक पुतळे व स्मारके ही छत्रपती शिवरायांचे आहेत. छत्रपती शिवरायांपासून गेल्या ३५० वर्षांत प्रत्येक पिढीला `जिवंत’ प्रेरणा मिळाली आहे. स्वराज्यावर आलेल्या संकटात नवनवे पर्याय शोधून यश मिळविण्याचे त्यांनी ध्येय ठेवले. त्याला मावळ्यांनी साथ दिली. एखाद्या राजाप्रमाणे न वागता छत्रपती शिवरायांनीही आपल्या मावळ्यांची व त्यांच्या कुटुंबियांचीही काळजी घेतली होती. युद्धात धारातिर्थी पडणाऱ्या मावळ्याच्या कुटुंबियांना अर्धा पगार दिला जात होता. तर त्यांच्या मुलांना प्रशिक्षण देऊन स्वराज्यात दाखल केले जात होते. सुमारे ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी फॅमिली पेन्शन सुरू केली होती, हे वैशिष्टयपूर्ण होते, असा उल्लेख नितीन बानगुडे-पाटील यांनी केला. अमित नागरे यांनी सूत्रसंचालन केले.
